नांदेड(प्रतिनिधी)-पोमनाळा ता.भोकर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दहशत माजविणाऱ्या पाच जणांविरुध्द भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी विरुध्द एकूण 8 गुन्हे दाखल असल्याचा अभिलेख सुध्दा आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता.भोकर येथील मुख्याध्यापक व्ही.ए.झुंजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.17 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास ते शाळेत काम करत असतांना साहेबराव मोतीलाल राठोड, एकनाथ शेषराव पवार, अंकुश भारत राठोड, संदीप दिलीप राठोड आणि विजय रतन जाधव असे पाच जण आले आणि बळजबरीने शालेय व्यवस्थापन समितीचे इतिवृत्त रजिस्टर हिसकावून नेले. घडलेल्या प्रकाराची माहिती गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भोकर यांना झुंजारे यांनी दिली होती. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या 21 डिसेंबरच्या उत्तरानंतर तक्रार देण्यात आली आहे. भोकर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 495/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 143, 332 आणि 34 नुसार दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
