नांदेड (प्रतिनिधी) – ग्रामीण व दुर्गम भागासह सर्व लोकांची शासनाशी संबंधित असलेली सर्व कामे पारदर्शक पद्धतीने व निर्देशीत केलेल्या कालावधीत निकाली निघाली पाहिजेत. यासाठी लोकाभिमूख प्रशासन महत्वाचे असते. प्रशासकीय पातळीवर याला अधिक गती मिळावी व कर्तव्य तत्परता वाढावी यादृष्टिने 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. लोकाभिमूख उपक्रम हीच सुशासनाची ओळख असते. याला चालना मिळावी व जिल्ह्यात ज्या-ज्या विभागामार्फत अधिक पारदर्शक व लोकाभिमूख कामे पार पडली आहेत अशा कामांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. चांगले उपक्रम हे सदैव राबविण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
सुशासन सप्ताह व 25 डिसेंबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या सुशासन दिनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, भोकर तहसिलदार राजेश लांडगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) रेखा काळम यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत सचित्र सादरीकरण केले.