नांदेड(प्रतिनिधी)-काल 18 डिसेंबर रोजी महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. काल निवडणुकींचे मतदान झाले. उद्या मतमोजणी होणार आहे. ज्या उमेदवारांनी साम-दाम-दंड आणि भेद या चार नितींचा प्रभावी वापर केला असेल ते निवडूण येतील.पण काही गावांमध्ये निवडणुकीच्या कारणांवरुन हानामाऱ्या झाल्या आहेत त्या संबंधाचे गुन्हे दाखल झाले आहेत. पुढची निवडणुक प्रक्रिया पाच वर्षानंतर येणार आहे.पण दाखल झालेल्या गुन्ह्यांची कायदेशीर प्रक्रिया निवडणुकी प्रक्रिया येईपर्यंत पुर्ण होणार नाही.
केंद्र सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण करतांना छोट्या-छोट्या पदांच्या पदाधिकाऱ्यांना विकास कामे करण्यासाठी अधिकार दिले. केंद्र सरकारची ही योजना देशातील प्रत्येक राज्यासह महाराष्ट्रात सुध्दा लागू झाली. त्यानुसार गावाच्या सरपंचांना सुध्दा मोठे अधिकार प्राप्त झाले. त्यातून आपल्या अधिकारांचा वापर करून कांहींनी उत्कृष्ट विकास कामे आपल्या गावासाठी केली. आजच्या परिस्थिती राज्यात अशी अनेक गावे आहेत. जी गावे शासनाच्या निधी मागतच नाहीत. कारण ती स्वत:च्या दमावर विकसीत झाली आहेत. काही गावांमध्ये प्रत्येक घराला बिसलेरी वॉटर पुरविले जाते. प्रत्येकाच्या घराला गरम पाण्याचे नळ आहेत. हा या सत्ता विकेंद्रीकरणाचा चांगला भाग आहे. या विक्रेंीकरणामुळे काही वाईटपण घडले आहे. ज्यात अनेक सरपंचांनी निधीचा घोटाळा केलेला आहे. काही वर्षांनी त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले. त्यांना आपल्या भ्रष्टाचाराचा नमुना सुध्दा मिळाला आहे आणि यामुळे पदाधिकारी असेच असतात. कोणालाही निवडून दिले तर काय फायदा असे जनता म्हणत आहे. म्हणून निवडणुकांमध्ये दाम या नितीला जास्त प्रभावी मानले गेले. आणि त्या जोरावर निवडूण आलेली पदाधिकारी मंडळी जनतेच्या कामांकडे नेहमीच दुर्लक्ष करते.
नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या कारणावरुन एक दुसऱ्याच्या डोके फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या संदर्भाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात एक गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 326 प्रमाणे दाखल आहे. भारतीय दंड संहितेत कलम 326 ला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आहे. आता निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपलेली आहे. पोलीस प्रशासन गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करणारच, न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना जावे लागणारच. त्यात आर्थिक भुर्दंड आला. वेळेचा अपव्यय आला आणि न्यायालय प्रक्रियेचा निकाल काय येईल याची शाश्वतीतर नाहीच. मग अशा प्रक्रियेतून जात असतांना पाच वर्षानंतर पुन्हा निवडणुक येईल. पण न्यायालयीन प्रक्रिया संपलेली नसणार . कारण भारतीय दंड संहितेतील काही कलमांप्रमाणे प्रकरण मिटवून घेता येत नाही. त्यामुळे संपुर्ण प्रक्रिया पार पाडावीच लागणार आहे. या सर्व शब्दप्रपंचातून वास्तव न्युज लाईव्हला जनतेसमोर मांडायचे आहे की, कशाला आपली डोके फोडून घेता आणि कोणासाठी फोडता. निवडणुक येणार असते, ती संपणार असते. मग स्वत: का दोषी होता. या गुन्ह्यांमध्ये काही युवकांची नावे आली असतील तर त्या गुन्ह्यांचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होईल. आजही निवडणुका संपल्या नाहीत आणि पुन्हा निवडणुका येतील. पुढच्या निवडणुकीत तरी कोणी निवडणुकीच्या कारणावरुन एक दुसऱ्याचे डोके फोडू नका अशी सर्वांसमक्ष कळकळीची विनंती आहे.
