2 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या दोन चैन कचऱ्यात शोधून परत केल्या
नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील एका घरातून मनपाच्या घंटागाडीत कचऱ्यासह त्यांच्या लहानमुलाने दोन सोन्याच्या चैन टाकून दिल्या. मनपा कर्मचाऱ्यांना ही बाब माहित झाल्यानंतर त्यांनी संपुर्ण घंटागाडीतील कचऱ्यात त्या सोन्याच्या चैन शोधून मालकाला परत दिल्या. सोन्याच्या चैन मालकांनी मनपा कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.या प्रामाणिकपणाची करावी तेवढी स्तुती कमीच आहे.
आज सकाळी शहरातील वजिराबाद भागात राहणारे विर ठाकूर यांच्या घरातील कचरा घंटागाडीत टाकण्यात आला. त्यांच्या घरातील एका लहान मुलाने त्यांच्या घरातील सोन्याच्या दोन चैन किंमत 2 लाख 50 हजार रुपयांच्या या चैनची किंमत असतांना फेकून दिल्या. लहान बालकाला सोन्याच्या किंमतीचे काही देणे-घेणे नसते.
आपल्या घरातील दोन चैन गायब असल्याची बाबत विर ठाकूर यांच्या कुटूंबियांना लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार मनपा क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 चे स्वच्छता निरिक्षक संजय जगतकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. संजय जगतकर, आर.ऍन्ड बी इंफ्रा कंपनीच्या वाहनाचे चालक शिवराज मगरे आणि प्रभाकर गोवंदे या तिघांनी संपुर्ण घंटागाडीतील कचऱ्यात दोन सोन्याच्या चैन शोधल्या. आणि विर ठाकूर परिवाराला परत केल्या. विर ठाकूर परिवाराने मनपा कर्मचाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.
मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त सुंकेवार, डॉ.पंजाब खानसोळे, क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव यांच्यासह सर्व मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यानी वर्गाने आपल्या कामाशी इमानदारी ठेवत कचऱ्यातील 2 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या चैन परत करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
