नांदेड(प्रतिनिधी)-जैवतंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रात प्रगती साधता येते. हे एक असे क्षेत्र आहे जे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि व्यवस्थापन ई. शैक्षणिक विभागाशी निगडित आहे. जैवतंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग घेऊन अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांना विकासाची दारे उघडी करता येतात. त्यामुळे जैवतंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.
ते आज सोमवार दि.१२ डिसेंबर रोजी विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये ‘जैवतंत्रज्ञान दिवस-२०२२’ निमित्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, पुणे येथील आदिटेकजेने प्रा. वि. चे संचालक डॉ. देवेंद्र लींगोजवार, अधिष्ठाता डॉ.एल.एन. वाघमारे, प्रा. एस.पी.चव्हाण, प्रोफेसर बी.एस. सुरवसे, डॉ. जी.बी. झोरे यांची उपस्थिती होती.
पुढे कुलगुरू म्हणाले, पुणे येथील आदिटेकजेने प्रा.ली. यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच विद्यापीठाच्या कोरोना प्रयोगशाळेमध्ये सिकलसेल तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे आपल्या जवळपास भागातील आणि विशेष म्हणजे आदिवासी भागातील सिकलसेल रुग्ण शोधता येतील आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करता येतील.
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे शिक्षणही जैवतंत्रज्ञानामध्ये झालेले आहे. त्यांनाही या विषयांमध्ये रुची आहे. ते आपले मत मांडताना म्हणाले, जैवतंत्रज्ञान विषयामुळे अनेक क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी संधी मिळते. संयुक्त राष्ट्र संघाने २०३० पर्यंत दिलेल्या १७ एस.डी.जी.(सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल)च्या अनुषंगाने जैवतंत्रज्ञानाचा महत्त्वाचा रोल आहे. शेती विषयक उत्पादन वाढीसाठी, आरोग्यमय जीवन जगण्यासाठी, वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी, स्वच्छ पाणी स्वच्छ हवा, ग्रीन एनर्जी इत्यादीसाठी जैवतंत्रज्ञान महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा विद्यापीठाचे सिनेट सदस्य नरेंद्र चव्हाण यावेळी म्हणाले, जैवतंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारा मालक होण्याचा प्रयत्न करावा.व्यवसायिक बना उद्योजक बना असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. भारतरत्न पंडित जवाहलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच १४नोव्हेंबर हा दिवस ‘जैवतंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत असतो. यानिमित्त विद्यापीठामध्ये या विषयावर तज्जांचे मार्गदर्शन शिकलसेल कॅम आणि पोस्टर सादरीकरण ठेवण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश धूळधडा यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. लक्ष्मीकांत कांबळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या विभागातील डॉ.टी.ए. कदम, प्रो. ए.पी.पाठक. डॉ. एच.जे. भोसले, श्याम नाईकनवरे,वसुधा कोडगिरे, आर.आर. शेरे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.