नांदेड(प्रतिनिधी)-आरोग्य अधिकाऱ्याच्या शेतातील आखाड्यावरून एक लाख 7 हजार रुपये किंमतीच्या म्हशी चोरणाऱ्या घोरबांडसह चार जणांना सोनखेड पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी सोनखेड पोलीसांचे कौतुक केले आहे.
दि.2 डिसेंबर रोजी डॉ. राजेंद्र शिवराम पवार, वैद्यकीय अधिकारी यांच्या शेतातील आखाड्यावरून 1 लाख 7 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याबाबतचा गुन्हा 6 डिसेंबर रोजी दाखल झाला. त्याचा क्रमांक 173/2022 आहे. सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले, पोलीस अंमलदार डब्ल्यू.एम.नागरगोजे, कदम, नागरगोजे या पथकाने या चोरीचा छडा लावतांना महेश भिमराव घोरबांड (23) रा.बोरगाव, दिगंबर संभाजी टरके (28), ओम गोविंद टरके(25) आणि हनमंत केशव टरके(22) तिघे रा.किवळा ता.लोहा अशा चार जणांना ताब्यात घेतले. त्यांनी डॉ.राजेंद्र पवार यांच्या आखाड्यावरील म्हशी चोरून टेम्पो क्रमांक एम.एच.26 ए.डी.8554मध्ये टाकून नेल्या होत्या. भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हस्सापूर ता.भोकर येथून या चार आरोपीसह त्यांनी चोरलेल्या दोन म्हशी आणि तो टेम्पो जप्त केला आहे. सोनखेड पोलीसांनी या गुन्हा क्रमांक 173 /2022 मध्ये टेम्पो आणि म्हशी असा एकूण 4 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासात सोनखेड पोलीसांनी केलेली कार्यवाही प्रशंसनियच आहे.
