नांदेड(प्रतिनिधी)-नवऱ्याला पळवतांना आपला प्रियकर आणि इतर तीन मित्रांची मदत घेणाऱ्या गितांजलीची पोलीस कोठडी आणखी एकदा, दुसऱ्यांदा दोन दिवसांनी वाढवून दिल्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एस.एल. सोयंके यांनी दिले आहेत.
1 डिसेंबर रोजी प्रकाश श्रीरामे या कर सल्लागारांना त्यांची पत्नी गितांजली पि.बळवंत हाके (35) तिचा प्रियकर बालाजी शिवाजी जाधव (28), दिलीपसिंग हरिसिंग पवार (29), अवतारसिंघ नानकसिंघ रामगडीया (38) आणि अमोल गोविंद बुक्तरे (26) अशा पाच जणांनी पळवून नेले. त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडून खंडणी वसुल केली, त्यांना उर्वरीत खंडणी नांदेडला देण्यास सांगितले असे सर्व प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात भाग्यनगर पोलीसांनी वर उल्लेखीत पाच जणांना अटक करून पहिल्यांदा 2 ते 4 डिसेंबर अशी पोलीस कोठडी प्राप्त केली. दुसऱ्यांदा दि.2 ते 6 डिसेंबर अशी पोलीस कोठडी प्राप्त झाली. आज 6 डिसेंबर रोजी दुसरी पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार ओमप्रकाश कौडे आणि इतरांनी न्यायालयात हजर करून वाढीव पोलीस मागणी करतांना खंडणी म्हणून वसुल केलेले 65 हजार रुपये वसुल करायचे आहेत. गितांजली कोणत्या कारमध्ये बसून सौरभ बारजवळ आली होती ती गाडी जप्त करायची आहे. तसेच या प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेले बालाजी जाधव, दिलीपसिंघ पवार व अवतारसिंघ रामगडीया या तिघांनी जिल्हाभरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 302, 307, 279, 304(अ) भारतीय हत्यार कायदा असे 24 गुन्हे केले असल्याची यादी सादर केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.एल. सोयंके यांनी गितांजलीसह पाच जणांची पोलीस कोठडी दोन दिवसांसाठी पुन्हा एका वाढवून दिली आहे.
संबंधीत बातमी..