नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी पकडलेल्या दुचाकी चोर आणि मोबाईल चोरांपैकी दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
वजिराबाद पोलीसांनी आपल्या माहितीच्या आधारावर तीन चोर पकडले होते. त्यांच्यासह एक चौथा विधीसंघर्षग्रस्त बालक होता. या चौघांकडून जवळपास 3 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल वजिराबाद पोलीसांनी जप्त केला आहे. या चोरट्यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका जबरी चोरी प्रकरणात आज भाग्यनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे, पोलीस अंमलदार हुंडे, प्रदीप गर्दनमारे, सातारे आदींनी शेख सलमान शेख निसार (18) आणि शेख शाहीद शेख इब्राहिम (20) या दोघांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या दोन चोरट्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
