नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनात तीन गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून चोरी केलेला 3 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची उत्कृष्ट कार्यवाही केली आहे.
दि.5 डिसेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार शरदचंद्र चावरे, गजानन किडे, मनोज परदेशी, संतोष बेलूरोड, व्यंकट गंगुलवार, शेख इमरान शेख एजाज, बालाजी कदम, रमेश सुर्यवंशी हे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सुरू केलेल्या क्युआर कोडची सकॅनींग करत गस्त करत होते. रेल्वे स्टेशन रस्त्यावर या पथकाला तेहरानगरमध्ये राहणारेे शेख सलमान शेख निसार आणि शेख अशफाक शेख रज्जाक रा.नुरीचौक असे दोन जण भेटले. त्यांची तपासणी केली. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या मालकी कागदपत्रांबद्दल विचारणा केली असता ती गाडी त्यांनी नरसी ता.बिलोली येथून दोन दिवसांपुर्वीच चोरी केलेली होती. काही दिवसांपुर्वी पोलीस ठाणे रामतिर्थच्या हद्दीतून त्यांनी दुचाकी गाडी चोरी केली होती. या दोघांना विश्र्वासात घेवून शेख शाहेद शेख इब्राहिम आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. त्यांनी 15 ते 20 दिवसांपुर्वी राज कॉर्नर या ठिकाणी रात्री 3 वाजेच्यासुमारास रेल्वे स्थानकावरुन घरी जाणाऱ्या एका व्यक्तीला अडवून त्याला मारहाण करून त्याच्याकडील लॅपटॉप व मोबाईल लुटला होता. याबद्दल भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या तीन चोरट्यांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून पोलीसांनी चोरीच्या दोन मोटारसायकली, गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी, चोरी केलेला एक लॅपटॉप आणि मालकी हक्क नसलेले 8 मोबाईल असा 3 लाख 22 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केलेल्या कामगिरीसाठी वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.
