नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या नवऱ्याला किडनॅप करून आपला प्रियकर आणि इतरांसह त्याला मारहाण करणाऱ्या खंडणी वसुल करणाऱ्या त्या पत्नीला न्यायालयाने आज पुन्हा एकदा दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कर सल्लागार प्रकाश तुकाराम श्रीरामे यांना त्यांची पत्नी गितांजली पि.बळवंत हाके (35) तिचा प्रियकर बालाजी शिवाजी जाधव (28), दिलीपसिंग हरिसिंग पवार (29), अवतारसिंघ नानकसिंघ रामगडीया (38) आणि अमोल गोविंद बुक्तरे (26) या सर्वांनी किडनॅप करून एका चार चाकी वाहनात कोंबले काही जण चार चाकी आणि काही जण दुचाकीवर प्रकाश श्रीरामे यांना घेवून औंढा रोडकडे गेले. एका ठिकाणी थांबवून त्यांना मारहाण करण्यात आली. जीवंत राहण्यासाठी 1 लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यावेळी त्यांच्या खिशात फक्त 65 हजार रुपये होते ते घेवून टाकले आणि उर्वरीत पैसे नांदेडला आणून देण्याची तंबी देत त्यांना रस्त्यावरच सोडून दिले होते.
याप्रकरणाची तक्रार प्रकाश श्रीरामे यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिली. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या किडनॅपींग करणाऱ्या महिलेसह तिचा प्रियकर आणि इतरांना दोन तासात गजाआड केले.
याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे यांच्याकडे देण्यात आला. सुनिल भिसे यांनी 2 डिसेंबर रोजी गितांजलीसह पकडलेले 5 जण न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने 4 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली.
आज दि.4 डिसेंबर रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे, पोलीस अंमलदार ओमप्रकाश कवडे, अश्र्विनी एडके, प्रदीप गर्दनमारे आणि सिद्दीकी यांनी पत्नी गितांजली पि.बळवंत हाके (35) तिचा प्रियकर बालाजी शिवाजी जाधव (28), दिलीपसिंग हरिसिंग पवार (29), अवतारसिंघ नानकसिंघ रामगडीया (38) आणि अमोल गोविंद बुक्तरे (26) अशा पाच जणांना न्यायालयात हजर केले. यांनी खंडणी घेतलेले 65 हजार रुपये जप्त करायचे आहेत, या आरेापींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्यापैंकी एक वाहन जप्त करायचे आहे असे सांगून वाढीव पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या पाच जणांना दोन दिवस अर्थात 6 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत वाढवून दिली आहे.