मुखेड,(प्रतिनिधी)- नांदेड येथील लुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत पोलीस निरीक्षक मीना बकाल आणि त्यांचे पतीदेव कुलभूषण बावस्कर या दोघांना पोलीस कोठडी संपल्यानंतर मुखेड न्यायालयाने जामीन दिलेला नाही. भ्रष्टाचारासाठी अनेकांना तुरुंगाची वाट दाखवणाऱ्या पोलीस निरीक्षक मीना बकाल यांना सुद्धा 60 हजार रुपयांच्या लाच प्रकरणात नाव आल्यामुळे सध्या तुरुंगात जावे लागले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असलेल्या जांब गावांत 20 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद येथील पोलीस अधीक्षक राहुल खाडे, पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर आणि त्यांच्या सहकारी पोलिसांना लावलेल्या सापळ्यात उदगीर येथील सय्यद इस्माईल आणि सय्यद शकील हे दोन भाऊ पकडण्यात आले. या दोघांनी एका तक्रारदाराकडून 60000 रुपये लाच स्वीकारली होती. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे सुरू असलेली चौकशी गोल करून घेण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. जोडीनंतर लाचेचा आकडा 70 हजार रुपये ठरला होता. त्यातील साठ हजार रुपये 20 नोव्हेंबर रोजी सय्यद शकील आणि सय्यद इस्माईल दोघे राहणार अहमदपूर यांनी स्वीकारले. तेव्हा औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना जेरबंद केले होते. दोघे सय्यद बंधू 23 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत होते. पुढे या प्रकरणाचा तपास नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक वांद्रे यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
तपासातील प्रगतीनुसार प्रलंबित असलेली चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथील महिला पोलीस निरीक्षक मीना बकाल यांच्याकडे होती. नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 नोव्हेंबर रोजी आपल्याच कार्यालयातील अधिकारी मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना अटक केली. मुखेड जिल्हा न्यायालयाने पती-पत्नीला 1 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले होते. एक डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून न देता न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्यानंतर न्यायालयात जामीन अर्ज आला होता की नाही. याबद्दल माहिती प्राप्त झाली नाही. मुखेड न्यायालयातील सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे मुखेड जिल्हा न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना सध्या तरी तुरुंगात पाठवले आहे. भ्रष्टाचारासाठी अनेकांना तुरुंगाची वाट दाखवण्याची जबाबदारी असलेल्या मीना बकाल यांना आपल्या पती देवासोबत तुरुंगात जावे लागले हे या प्रकरणातील सत्य आहे.