नांदेड, (प्रतिनिधी)- शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहसीन कॉलनी, देगलूर नाकाजवळ 1 डिसेंबरच्या रात्री 1.30 वाजता पाच-सहा जणांनी तीक्ष्ण हत्यारांनी दोन युवकांवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणात नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी साहेब यांनी सकाळपर्यंत प्रतिसाद दिला नाही अशी खात्रीलायक माहिती आहे. परंतु इतवाराचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेतले आहे. भगवान धबडगे यांचा फोन सुद्धा श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांनी रात्री उचलला नसल्याची माहिती आहे.
एक डिसेंबरच्या रात्री 1. 30 वाजता शहरातील मोहसीन कॉलनी भागात हर्षवर्धन / सुभाष नाव पूर्ण माहित नाही आणि अमोल चावरे दोघे राहणार धनेगाव या दोन युवकांवर पाच-सहा जणांनी तीक्ष्णहत्याराच्या साह्याने जीवघेणा हल्ला केला. घटना घडतात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ड्युटी ऑफिसर यांनी आपले प्रभारी अधिकारी श्री अशोकरावजी साहेबांना अनेक कॉल केले अशी खात्रीलायक माहिती सांगण्यात आली, तरी पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. इतवाराचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे आपल्या सहकारी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. भगवान धबडगे आणि श्री अशोकरावजी साहेब हे दोघे बॅचमेट आहेत म्हणून त्यांनी सुद्धा श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांना अनेक कॉल केले परंतु घोरबांड साहेबांनी प्रतिसाद दिला नाही अशी माहिती घटनास्थळी हजर असणाऱ्यांनी सांगितली. एक डिसेंबर चा सूर्योदय झाल्यानंतर सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांनी घाई सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
दोन जखमी युवकापैकी एका जणांच्या किडनी जवळ तीक्ष्णहत्याराचा घाव लागलेला आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आपल्या पोलीस स्टेशनची हद्द नसतानासुद्धा भगवान धबडगे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी त्या दोन युवकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या 5 ते 6 जणांपैकी 1 संशयित अब्दुल कलीम अब्दुल मन्नान यास ताब्यात घेतले असल्याची माहिती घटनास्थळावर हजर असणाऱ्यांनी सांगितली.
घडलेली घटना भयंकर असताना सुद्धा प्रभारी पोलीस निरीक्षकांनी दाखवलेला उशिरा प्रतिसाद याबद्दल त्यांना कोण चौकशी करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश ऐकले म्हणजे सर्व काही छान चालले आहे असे नसते. भारतीय लोकशाहीत सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानला गेला त्याचे संरक्षण करण्यासाठीच पोलीस विभागातील अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या मेहनतीने वर्दी धारण केलेली आहे असे लोक सांगतात. इतर हल्लेखोरांमध्ये 2 सोहेल आणि 1 बंबईया अशी नावे असलेली तीन युवक आहेत असे त्या भागातील नागरिक सांगतात.