नांदेड(प्रतिनिधी)-दि.17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता शेतकरी उमाजी माधवराव कदम आणि गंगाधर गिरमाजी दालकुसे यांच्या नांदेड-वसमत रस्त्यावरील मरळक गावातील शेतातून 67 पोते सोयाबीन असा 1 लाख 74 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. ते चार चोरटे लिंबगावचे पोलीस निरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून असे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मरळक गावातून 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या या चोरी प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कोंडीबा केसगिर यांच्याकडे होता. त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार प्रकाश मोरे, प्रकाश पद्देवाड, मुंजाजी चौरे, दत्तराव शिंदे यांनी मेहनत घेवून अमोल आनंदराव मल्हारे रा.पांगरा, शेख अरबाज उर्फ अब्बु शेख सत्तार, सय्यद अलीम सय्यद मनसुर, विष्णुकांत उर्फ गोग्या हिरामण कस्तुरे तिघे रा.बाभुळगाव ता.वसमत जि.हिंगोली यांना ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून पोलीसांनी चोरलेले सर्व 67 पोते सोयाबीन जप्त केले आहे.
लिंबगाव पोलीसांनी केलेल्या तपासात अशीही माहिती समोर आली आहे की, या चोरट्यांनी तामसा, हिमायतनगर, कुंटूर, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पेडगाव, मानवत रोड, पुर्णा, जिंतूर, हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव आणि वारंगा, वाशीम जिल्ह्यातील रिसोड आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपुर येथे एकूण 12 ठिकाणी गोदाम फोडून सोयाबीन आणि हळद चोरल्याचे 12 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी लिंबगाव पोलीसांचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे. न्यायालयाने या चार चोरट्यांना आजपर्यंतची पोलीस कोठडी दिली होती.
