नांदेड (प्रतिनिधी)- डंकीनजवळ 30 वर्षीय युवकाच्या झालेल्या खुनाचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. ते फुटेज पाहिले असताना समाजाचा ठेका घेतलेल्या लोकांनी आपल्याच समाजाची कशी वाईट अवस्था केली, हे दिसते. समाजासाठी त्यांनी हे कृत्य केले असेल मग पळून का गेले. खून करून पोलिसांसमोर हजर व्हायला हवे होते. आपल्याच हाताने आपणच फसल्याचा हा प्रकार अत्यंत दुर्देवीपणे एका युवकाच्या मृत्यूमध्ये बदलला.
काल दि. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गोदावरी नदीच्या काठी डंकीनजवळ एका युवकाला आठ ते दहा जणांनी लाकडे, काठ्या यांच्या सहाय्याने केलेल्या मारहाणीत त्या युवकाचा मृत्यू झाला. विमानतळ पोलीस ठाण्यात ऑटोचालक शेषराव बाबाराव नागेश्वर रा. बसवंतानगर, नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा स्वप्नील (30) यास अज्ञात आठ ते दहा लोकांनी उचलून नेले आणि आमच्या समाजाच्या मुलीसोबत का बोलतोस, काय संबंध आहेत, अशी विचारणा करून त्याला मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 398/2022 भारतीय दंड संहितेचे कलम 364, 302, 147, 148, 149 नुसार दाखल केला. या गुन्हयाचा तपास शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे.
ही घटना घडली तेव्हा त्यावर 21 नोव्हेंबरच्या दुपारी 3 वाजेच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज वेळ आणि तारीख दिसते. या घटनेत एका महिलेला सोबत आणुन दहा ते बारा युवकांनी तिला एका सिमेंटच्या बाकावर बसविले, या महिलेच्या हातात एक लहान बाळ पण आहे. तिला मारहाण केल्याची दिसत आहे, तेथूनच काही जण लाठ्या, काठ्या घेऊन समोर दिसणाऱ्या एका रूमच्या मागे जात आहेत. तेथे स्वप्नील नागेश्वरला मारहाण झालेली आहे. हे हल्लेखोर त्या महिलेची बेअदबी तर करतच आहेत, सोबतच तिचा व्हिडीओ बनवत आहेत. समाजाचा ठेका घेतलेल्या हल्लेखोरांनी स्वप्नील नागेश्वरचा मृत्यू झाल्यावर तेथून पळ काढला असा प्रश्न उपस्थित होत आहे. समाजाच्या भल्यासाठी त्यांनी हे काम केले असेल तर तेवढ्याच छातीठोकपणे त्यांनी पोलिसांच्या समक्ष हजर होऊन दाखवायला पाहिजे होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे सर्व युवक आता खुनाचे गुन्हेगार झाले आहेत. काय समाजाचे त्यांनी भले केले हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. गुन्हा 398च्या तक्रारीत भरपूर काही बाबी लिहिलेल्या आहेत, पण त्या आम्ही आमच्या बातमीत उल्लेखीत करू इच्छित नाही.
संबंधित सीसीटीव्ही..
कोणी दिला होता यांना समाजाच्या सुधारणेचा ठेका, का घेतला होता त्यांनी हा ठेका, त्यांच्या समाजातील मुले असे अनेक प्रकार करतात, अशा किती लोकांचे खून झाले आहेत, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. स्वप्नील नागेश्वरचा मृत्यू झाला, पण ही मारहाण करणारी समाजाची ठेकेदार मंडळी आता खुनाचे आरोपी झाले आहेत. विचारवंत सांगतात चांगल्या कामाची सुरूवात आपल्या घरापासून करायला हवी. दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची वृत्ती ही दुर्देवी आहे. काही वर्षांपुर्वी नांदेडमध्ये असाच एक प्रकार घडला होता, ज्यात एका महिलेला आणि त्याच्या सोबतच्या माणसाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्या महिलेला बघण्यासाठी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. या परिस्थितीत ती महिला त्या जबाबासमोर आली आणि म्हणाली, मला आणि माझ्या लेकरांना कुणी भाकरी आणुन दिली नाही, मग आज मला पहायला का आलात. महिलेचे शब्द ऐकताच तेथे हजर असणारा जमाव तेवढ्याच जलदगतीने परागंदा झाला होता. त्या महिलेच्या शब्दांमध्ये लपलेले दु:ख खूप महत्वाचे होते. त्या महिलेला पाहणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे एवढ्यासाठीच तो जमाव आला होता. परंतु त्या एकट्या महिलेने मोठ्या जमावाची एका क्षणात हिवशी केली.
आजच्या स्वप्नील नागेश्वरच्या घटनेत स्वप्नील नागेश्वर तर जीवनातून मुक्त झाला, पण त्याचा खून करणारी ही मंडळी आपल्या नावावर स्वत:च्या हाताने डाग लावून घेणारी ठरली. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लक्षपुर्वक पाहिले असता मारहाण करणाऱ्या युवकांचे वय सुद्धा लहानच आहे. यांना अजून अभ्यास करायचा, समाज काय असतो, सामाजिक दायित्व काय असतात आणि ही दायित्वे पुर्ण करताना किती त्रास होतो. एखाद्या युवकाचा खून केला म्हणजे तुम्ही आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले असा त्या घटनेचा अर्थ नक्कीच होत नाही. वाचकांच्या सुविधेसाठी ज्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आम्ही ही जी बातमी लिहिली आहे ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आम्ही बातमीत जोडले आहे.
संबंधित सीसीटीव्ही..