नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी समाज सेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकूंद दायमा आज नांदेडला आले होते. त्यांनी नांदेड येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेवून विविध प्रलंबित लाभ मंजुर करण्यासाठी निवेदन दिले आहे. मुकूंद दायमा राज्यभर फिरून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची मदत करीत आहेत.
आज पोलीस अधिक्षक कार्यालयात मुकूंद दायमा आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक सेवानिवृत्त पोलीस अंमलदार पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना भेटले. या लोकांनी दिलेल्या निवेदनानुसार चौथ्या व पाचव्या वेतन आयोगादरम्यान एक लाभाची आणि सहाव्या वेतन आयोग दरम्यान दोन लाभाची तसेच सातव्या वेतन आयोगापासून तीन लाभाची सुधारीत सेवाअंतर्गत आश्वासीत प्रगती योजना पोलीसांना मिळावी. पोलीस कर्मचाऱ्यांना 20 वर्ष सेवाटप्यामधील थेट एएसआय पदाचा वेतन श्रेणीचा दुसरा लाभ व तीस वर्ष सेवाटप्यावरील तिसरा लाभ पीएसआय पदाच्या श्रेणीचा मिळावा यासाठी विनंती केली.
आपल्या निवेदनासोबत महाराष्ट्र शासनाचे सात शासननिर्णय जोडले आहेत. यानुसार सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुध्दा या आश्र्वासीत प्रगती योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. मुकूंद दायमा यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या लाभांसाठी अनेक लढे दिले. मुकूंद दायमा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सर्वांच्या अनुरूप शासनाने बरेच निर्णय मान्य केले. म्हणताना लालफितीमध्ये अडकलेल्या संचिका उशीराच निघतात असाच काहीसा भाग शासनाचे अनेक निर्णय झाले असतांना सुध्दा पोलीस कर्मचाऱ्यांचा अधिकाराचा लाभ मिळण्यास त्यांना उशीर लागत आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शासनाच्या निर्णयानुसार लवकरात लवकर कार्यवाही करेल असे आश्र्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.
यावेळी मुकूंद दायमा यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील समर्पण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मधुकर केंद्रे, संभाजी होणराव, राजकुमार गुप्ता, रघुनाथ सुर्यवंशी, उगले, उजेडकर यांच्यासह हिंगोली, वसमत येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी हजर होते.
