नांदेड(प्रतिनिधी)-हरवलेली चार अल्पवयीन बालके सिंदखेड पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 12 तासात शोधून पुण्यावरून परत आणली आहे. त्यांच्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील चार मुले दि.14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्यासुमारास एका बालकाला सोडण्यासाठी दुसऱ्या गावाला गेले. तेथे तो बालक शाळेच्या वस्तीगृहात राहत होता. परंतू ही बालके त्या शाळेतही पोहचली नाही आणि परतही आली नाहीत. तेंव्हा या बाबतची माहिती पोलीस ठाणे सिंदखेड येथे देण्यात आली. त्यावरुन सिंदखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा क्रमांक 139/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके यांनी आपल्याकडेच ठेवला. आपले सर्व कसब वापरून तिडके आणि त्यांच्या सहकारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी ही चार अल्पवयीन बालके सध्या पुण्यात असल्याची माहिती काढली. त्वरीत प्रभावाने सिंदखेडचे पोलीस पथक पुण्यात गेले आणि या चार अल्पवयीन बालकांना पुन्हा सिंदखेड येथे आणून त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले आहे. यामध्ये दोन भाऊ आणि एक बहिण आणि चौथा मुलगा ही सर्वच बालके अल्पवयीन आहेत.
अत्यंत त्वरीत प्रभावाने कामगिरी करणाऱ्या सिंदखेड पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांनी भालचंद्र तिडके, पोलीस अंमलदार कुमरे, पठाण, शेंडे आणि मोपले यांच्या कौतुक केले आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सायबर पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदरांचा मोठा वाटा आहे.