नांदेड(प्रतिनिधी)-नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी थर्ड आय (तिसरा डोळा) नावाचे एक ऍप बनवले असून या ऍपसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील बिट अंमलदारांना दर दोन तासाला आपली हजेरी या स्कॅनरवर द्यावी लागेल. त्यामुळे पोलीसांची उपस्थिती आपल्या हद्दीत कायम दिसणार आहे.
नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेडला हजर झाल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट योजना राबवली. शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या जवळपास 25 बीट अंमलदारांना एक नवीन काम करण्याची जबाबदारी दिली. यामध्ये एका बीटमध्ये 25 जागी थर्ड आय या नावाचे स्कॅनर लावण्यात आले आहे. तो ऍप प्रत्येक पोलीस बीट अंमलदाराकडे देण्यात आला आहे. या बीट अंमलदाराने दर दोन तासाला 25 स्कॅनर असलेल्या जागी जाऊन आपला मोबाईल स्कॅन करायचा आहे. त्यामुळे तो संबंधीत बीट अंमलदार या भागात कायम गस्त करत आहे याची हजेरी पोलीस अधिक्षकांपर्यंत काही सेकंदात पोहचाणार आहे. एक उत्कृष्ट कार्यप्रणाली असे याचे वर्णन करता येईल. ज्या पोलीस अंमलदारांना आपल्या कामाला फाटा द्यायचा आहे. त्यांना आता हे फाटा देणे अवघड होणार आहे. स्कॅनरच्या संदर्भाने माहिती घेतली असतांना तो स्कॅनर एकदा स्कॅन केल्यानंतर दोन तासाच्या अगोदर पुन्हा स्कॅनींग घेत नाही म्हणजे त्यात सुध्दा बनावटपणा करण्यासाठी कोणतीही जागा राहणार नाही. जवळपास सर्व पोलीस बीट अंमलदारांकडे शासकीय गाड्या आहेत. त्यासाठी त्यांना पेट्रोल दिले जाते त्यामुळे असे काम करण्यात काही अडचण येणार नाही.प्राप्त माहितीनुसार तांडा बारवर सुध्दा हे थर्ड आय स्कॅनर लावण्यात आले आहे.
कोणतीही एक नवीन बाब अंमलात आणण्याचा प्रयत्न होतो तेंव्हा त्यात काही बाजू अनुत्तरीत राहतात. एखाद्या बीट अंमलदाराची ड्युटी सकाळी 8 पासून सुरू झाली आहे तर ती 2 वाजता संपते. 2 वाजता सुरू झालेल्या बीट अंमलदाराची ड्युटी रात्री 8 वाजता संपते आणि रात्री 8 वाजता सुरु झालेली ड्युटी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता संपते. अशा पध्दतीने बीट अंमलदारांचे काम काज चालते. काही बीट अंमलदारांकडे स्वत:च्या व्यक्तीगत दुचाकी गाड्या आहेत. त्यांना सुध्दा पेट्रोल मिळायला हवे. एखाद्या बीट अंमलदाराच्या ड्युटीमध्ये दाखल झालेला गुन्हा कलमांच्या प्रमाणे बीट अंमलदारांकडे दिला जातो. या परिस्थितीमध्ये मात्र थोडी अडचण आहे ती अशी की, बीट अंमलदाराला स्कॅनर करण्यापेक्षा त्या घडलेल्या गुन्ह्याच्या कामाला जास्त महत्व द्यावे लागेल. त्यामुळे तो बीट अंमलदार स्कॅनींग करण्यासाठी जाऊ शकणार नाही आणि मग त्याला याचे खुलासे द्यावे लागतील. या संदर्भाने सुध्दा एक पर्यायी उपाय योजना करण्यात यावी तर थर्ड आय ही कल्पना जास्त प्रभावीपणे अंमलात येईल. सोबतच एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी बीट अंमलदाराने आपल्या चौकीत काही लोकांना बोलवले असेल तर ते काम पुर्ण करण्यासाठी त्या बीट अंमलदाराला लागणारा वेळ जास्त असेल आणि पुन्हा परत स्कॅनिंग करण्याच्या वेळेत त्याच्याकडून चुका होतील. यासाठी सुध्दा एखादी पर्यायी व्यवस्था तयार करण्यात आली तर जास्त छान होईल. एका बीटमध्ये 25 ठिकाणी स्कॅनिंग करण्यासाठी दर दोनतासाला जावे लागेल अशा परिस्थितीत त्या बीट अंमलदाराकडे प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या निर्गतीचे काय याचाही विचार व्हावा तर नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तयार केलेली थर्ड आय योजना अत्यंत प्रभावीपणे काम करेल.
