नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील देना बॅंक चौकात असलेला पायी उड्डाणपुल हा कधीही धोकादायक आहे. त्यामुळे मोरवीसारखी दुर्घटना होवू शकते. तेंव्हा या पादचारी पुलाला काढून टाकावे असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सरदार जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी दिले आहे. असाच एक पादचारी उड्डाणपुल देगलूरनाका येथे सुध्दा आहे. या दोन पुलांना मिळून त्यावेळी जवळपास 1 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च झाला होता. पण हे दोन्ही पुल खऱ्या अर्थाने बिनकामी आहेत.
सरदार जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी आज कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे दिलेल्या निवेदनानुसार सन 2008 च्या गुर-ता-गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने यात्रेकरूंसाठी जाण्या-येण्याची सोय योग्य व्हावी म्हणून गुरुद्वारा चौरस्ता, देना बॅंक चौक येथे एक पादचारी उड्डाणपुल बांधण्यात आला. या उड्डाणपुलामध्ये असलेली क्षमता अत्यंत तोकडी आहे. या उड्डाणपुलावर गुरूद्वाऱ्यातील विविध कार्यक्रमांच्यावेळी शेकडोच्या संख्येने लोक उभे राहतात. या उड्डाणपुलामधील क्षमता कमी असल्याने या शेकडो लोकांचा भार पुल सांभाळेल की नाही या भितीने विविध कार्यक्रमांच्यावेळी पोलीस विभागाच्यावतीने या पुलावर लोक जाणार नाहीत याची पराकाष्टा केली जाते. मागील महिन्यात गुजरातचा मोरवी पुल पडून 140 जणांचा मृत्यू झाला होता. अशी घटना या पुलामुळे सुध्दा घडू शकते अशी शक्यता निवेदनात लिहिली आहे. आज हा पुल तयार होवून 14-15 वर्ष झाली आहेत. महानगरपालिकेने हा पुल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केलेला आहे. या पुलामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी आता सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे म्हणून हा पुल लवकरात लवकर काढून टाकावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
असाच एक पादचारी उड्डाणपुल देगलूर नाका परिसरात आहे. गुरूद्वारा चौक आणि देगलूर नाका येथे तयार झालेल्या या उड्डाणपुलांसाठी त्यावेळी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झालेला आहे. देगलूर नाक्याच्या उड्डाणपुल सुध्दा कोणीच वापरत नाही. त्यामुळे हा उड्डाणपुल सुध्दा कुचकामी आहे. तोही पुल काढला जावा अशी अपेक्षा आहे.
