नांदेड(प्रतिनिधी)- एका महिलेला तिच्या मुलीला नोकरी लावतो म्हणून 1 लाख रुपये तिची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीविरुध्द गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात तिसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भीनी इंबिसात देशमुख यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची 20 हजार रुपये रक्कम फिर्यादी महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा गुन्हा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 156(3) प्रमाणे न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल झाला होता.
शांताबाई भुजंगराव हंबर्डे या विष्णुपूरी येथील महिलेलेने दिलेल्या तक्रारीनुसार 14 एप्रिल 2008 रोजी त्यांच्या घरी बालाजी भुजंगराव कुटे (35) आणि त्यांच्या पत्नी कानुपात्रा बालाजी लुटे (30) दोघे रा. विष्णुपूरी हे आले आणि शांताबाई हंबर्डेची मुलगी ही 12 वी पास झाली आहे. त्या मुलीला विद्यापीठात नोकरी लावून देतो. पण त्यासाठी खर्च लागेल म्हणून 1 लाख रुपये मागितले. शांताबाई हंबर्डे ने त्यांना 1 लाख रुपये दिले परंतू विजयाला नोकरी लागली नाही. तेंव्हा शांताबाईने याबाबत तक्रार केली. पोलीसांनी दखल घेतली नाही म्हणून शांताबाई हंबर्डेने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 149/2009 भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार व्ही.आर. केंद्रे यांनी केला.
न्यायालयात हा नियमित फौजदारी खटला क्रमांक 805/2009 प्रमाणे चालला. या खटल्यात तीन साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध लेखी पुरावा, तोंडी पुरावा आणि युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश देशमुख यांनी या प्रकरणातील बालाजी भुजंगराव लुटे यास भारतीय दंड संहितेच्या कलम 420 प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि 10 हजार रुपये रोख दंड. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा तसेच कलम 406 नुसार एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि 10 हजार रुपये रोख दंड, दंड न भरल्यास साध्या कैदेची शिक्षा प्रस्तावीत केली. दंडाचे 20 हजार रुपये रक्कम न्यायालयात भरल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून ती रक्कम शांताबाई भुजंगकराव हंबर्डे यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.एस.एस.वाघमारे यांनी बाजू मांडली. आरोपी बालाजी लुटेच्यावतीने ऍड.गोविंदराव हंडे यांनी काम पाहिले तर त्यांची पत्नी कानुपात्रा यांच्यावतीने ऍड.आर.एन. आवटे यांनी काम केले. या प्रकरणातून कानुपात्रा लुटे यांची मुक्तात झाली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदारा शेख रब्बानी यांनी काम केले.
