नांदेड(प्रतिनिधी)-दि.3 नोव्हेंबरच्या रात्रीच्या अर्थात 4 तारेखच्या पहाटे इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दुकाने फोडण्यात आली. तसेच वजिराबाद भागात एक दुकान फोडण्यात आली होती. या चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 48 तासात जेरबंद करून चोरट्यांना दाखवून दिले की आम्ही तयार आहोत.
दि.4 नोव्हेंबरच्या पहाटे पोलीस ठाणे इतवारा हद्दीत लोहारगल्ली येथील साईनाथ मेडीकल, जुना मोंढा भागातील नोमुलवार मेडीकल, कृष्णकुमार ट्रेडींग कंपनी आणि एच.रहिम ऍन्ड कंपनी अशी चार दुकाने फोडण्यात आली. तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुशी ज्वेलर्स हे दुकान फोडण्यात आले.या संदर्भाने इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 306/2022 आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 388/2022 दाखल झाले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला काही चोरट्यांची माहिती दिली आणि त्यांना पकडण्यास सांगितले. पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे यांच्यासह पोलीस अंमलदार मारोती तेलंगे, गुंडेराव कर्ले, शंकर म्हैसनवाड, संजय जिंकलवाड, देविदास चव्हाण, मोतीराम पवार, विलास कदम, गणेश धुमाळ, बालाजी तेलंग, बजरंग बोडके, महेश बडगु, राजबन्सी, हनुमानसिंह ठाकूर, हेमंत बिचकेवार आदींनी माळटेकडी ते देगलूर नाका जाणाऱ्या रेल्वे ब्रिजजवळ गजनसिंग ठाकूरसिंग बावरी (19) रा. हनुमानगल्ली उमरी, मंगलसिंग हिरासिंग बावरी (19) रा. शिवाजी चौक परळी ह.मु.क्रांतीनगर देगलूर, सोरनसिंग मंगलसिंग जुन्नी (26) रा. लक्ष्मीनगर नांदेड अशा तिघांना पकडले. या चोरट्यांनी गुन्हे करण्यासाठी दोन मोटार सायकली चोरल्या होत्या. त्या चोरीच्या दुचाकी गाड्या आणि तीन गुन्हेगार सध्या इतवारा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील तपास करण्याची जबाबदारी आहे. या घटनेतील तीन चोरटे गजनसिंग बावरी, मंगलसिंग बावरी आणि सोरनसिंग जुन्नी या तिघांना पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांनी आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या तिघांना 2 दिवस पोलीस कोठडीत पाठविले.