नांदेड,(प्रतिनिधी)- खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर आपले नाव लावण्यासाठी तडजोडीनंतर ३ हजार ५०० रुपये लाच स्वीकारणाऱ्या नायगाव येथील तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.
दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी नायगाव तलाठी सज्जातील एक माणसाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की,त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर असलेल्या इतर हक्कातील रकान्यात असलेली नावे वगळून त्यांचे नाव सातबारा अभिलेखात लावण्यासाठी नायगावचे तलाठी बालाजी सीताराम राठोड ४ हजारांची लाच मागणी करीत आहेत.याबाबत एसीबी पथकाने त्याच दिवशी पडताळणी केली.तेव्हा तडजोडीत ३ हजार ५०० रुपये लाच घेण्याचे ठरले.तेव्हा रात्रीचा अंधार पडल्यानंतर तलाठी बालाजी सीताराम राठोड यांनी ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना जेरबंद केले.याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एसीबी पथकाचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे,अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण,पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन बोडके,ढवळे,पोलीस अंमलदार संतोष शेट्टे, राजेश राठोड, ईश्वर जाधव,यशवंत दाभनवाड,प्रकाश मामुलवार यांनी सापळा कार्यवाही केली आहे.
एसीबी विभागाच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड मोबाईल क्रमांक 9623999944,राजेंद्र पाटील पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड
मोबाईल क्रमांक – 7350197197,कार्यालय दुरध्वनी – 02262-253512 @ टोल फ्रि क्रं. 1064*