ताज्या बातम्या नांदेड

75 लाखांचा गुटखा बाळगणाऱ्या एकाला चार दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)- काल दि. 2 नोव्हेंबर रोजी अन्न व औषधी प्रशासनाने शहरातील मुरमुरागल्ली भागातील तीन बंद दुकाने फोडून त्यातून 74 लाख 11 हजार 350 रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला होता. या प्रकरणातील पकडलेल्या एका आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दुपारी शहरातील मुरमुरागल्ली भागात एका गल्लीमध्ये असलेले तीन शटर तपासण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाची मंडळी तेथे पोहचली तेंव्हा त्यांना चाब्या सापडल्या नाहीत आणि तेथे हजर असणारा एक पळून गेला, एक पोलीसंानी ताब्यात घेतला. त्यानंतर पंचासमक्ष तीन बंद दुकानांचे कुलूप तोडून तपासणी केली असता त्यामध्ये 74 लाख 11 हजार 350 रुपये किंमतीचा राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा हा पदार्थ सापडला. याबाबत अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी संतोष कनकावाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख अलीमोद्दीन शेख खमरोद्दीन (33) रा.परभणी आणि अझीमोद्दीन (37) रा.इकबालनगर परभणी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. यातील अजीमोद्दीन पोलीस व अन्न औषधी प्रशासनाच्या ताब्यात आला नाही. या बंद दुकानांवर तवक्कल ट्रेडर्स असे नाव आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 397/2022 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे आहे. आज दि.3 नोव्हेंबर रोजी शिवराज जमदडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या शेख अलीमोद्दीन शेख खमरोद्दीन यास न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. तेंव्हा न्यायाधीश देसरडा यांनी शेख अलीमोद्दीनला चार दिवस अर्थात 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *