नांदेड(प्रतिनिधी)-राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका चार चाकी गाडीतून 25 बॉक्स बनावट देशी मद्य आणि दहा बॉक्स बनावट परराज्यातील विदेशी मद्य पकडले आहे. मद्य आणि दोन चार चाकी गाड्या असा 10 लाख 83 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. या संदर्भाने अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्यावतीने प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. पण हे बनावटी मद्य कोणाच्या ताब्यातून पकडले यांची नावे मात्र देण्यात आली नाहीत.
आज दि.3 नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक अतुल कानडे यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रेसनोट नुसार राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप आणि संचालक सुनिल चव्हाण तसेच विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनानुसार वारंगा ते अर्धापूर रस्त्यावरील पार्डी मक्ता शिवारात 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता दोन चार चाकी गाडीची तपासणी करण्यात आली. त्यात विविध नावांचे बनावटी देशी दारु आणि पर राज्यातील विदेशी दारुचे 35 बॉक्स सापडले. हे साहित्य तसेच दोन गाड्या असा 10 लाख 83 हजार 60 रुपयंाचा ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि 3 फरार आहेत. बालाजी पवार यांच्या तक्रारीवरुन आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दुय्यम निरिक्षक अनिल पिकले अधिक तपास करीत आहेत. या प्रेसनोटमध्ये 8 आरोपींची नावे मात्र देण्यात आली नाहीत. ही कार्यवाही ए.बी. चौधरी, ज्योती गुट्टे, राजकिरण सोनवणे, ए.जी.शिंदे, विकास नागमवाड, जी.जी.रेणके, श्रीनिवास दासरवार, अमोल राठोड, रावसाहेब बोदमवार यांनी केली. या प्रेसनोट सोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन्न विभागाला टोल फ्री क्रमांक 18008333333, व्हाटसऍप क्रमांक 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 02462-287616 वर माहिती द्यावी.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रेसनोटसोबत मद्य आणि आरोपींचा फोटा सुध्दा प्रसारीत केला आहे. त्यात दोन आरोपी बसलेले दिसतात पण त्यांची नावे प्रेसनोटमध्ये दिलेली नाहीत. तसेच चार चाकी गाड्यांचे क्रमांक सुध्दा प्रेसनोटमध्ये लिहिलेले नाहीत. प्रेसनोटप्रमाणे पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे फोटोमध्ये फक्त 2 दिसत आहेत.
