नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड महानगरपालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सतिश माहेश्र्वरीच्या सात पिढ्यांचे भले केले. त्यांच्या सन्मान कंस्ट्रक्शन या कार्यालयात 22 लाख रुपयांची चोरी आज उघडकीला आली.
रेल्वे स्थानक रस्त्यावर महानगरपालिकेच्या जागेवर मोठे व्यापारी संकुल उभारून त्यातील दुकाने 60 वर्षाच्या लिजवर विक्री करण्याचे अधिकार असतांना त्यात बेकायदेशीररित्या ती दुकाने विक्री करणाऱ्या सतिश माहेश्र्वरी यांचे सन्मान कंस्ट्रक्शन कार्यालया सुध्दा याच इमारतीत आहे. आज सकाळी 11 वाजेच्यासुमारास असे लक्षात आले की, या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज बंद करून कोणी तरी या कार्यालयातील 22 लाखांची रोकड चोरून नेली आहे. घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलीस पथक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली.
सीसीटीव्ही फुटेज…
घटनेतील गांभीर्य पाहता पोलीसांनी श्वान पथकाला पण बोलावले होते पण चोरांना शोधणारा श्वान कुठपर्यंत माग काढू शकला हे कळले नाही. या कार्यालयातील एकाच ड्राव्हर उघडलेले होते. ज्यात 22 लाख रुपये रोख रक्कम होती. घडलेला प्रकार सीसीटीव्हीमध्ये येवू नये म्हणून त्या भागातील सीसीटीव्ही सुध्दा बंद करण्यात आले होते. इतरांना तुझ्याकडे हजारोंची रक्कम कोठून आली असा प्रश्न नेहमी विचारणाऱ्या पोलीसांनी सतिश माहेश्र्वरीने 22 लाख रुपये रोख रक्कम कार्यालयाच्या ड्राव्हरमध्ये कशी ठेवली याबद्दल विचारणा केली की नाही याची माहिती प्राप्त झाली नाही.वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणातील गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. त्या कार्यालयाचे सीसीटीव्ही उपलब्ध नसले तरी इतर सीसीटीव्हीमध्ये एक युवक एक जॅकीट आणि डोक्यावर टोपी बांधून हळूहळू त्या कार्यालयाकडे आला आणि त्या कार्यालयातून परत निघाल्याचे दृश्य दिसत आहे. पण त्याची ओळख मात्र अद्याप कोणाला पटलेली नाही.