नांदेड, (प्रतिनिधी)- हैद्राबाद शहरातील पोलिसांनी नांदेड शहरातील शिवमंदिर जवळून दोन पुरुष आणि एक महिला यांना ताब्यात घेतले आहे. या लोकांवर तेलंगणा राज्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान हैदराबाद शहरातील नल्लागुट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. कृष्णा यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसह नांदेडच्या शिवमंदिर परिसरातील गंगाप्रसाद दिलीप वरवंटे (31), उद्देश दिलीप वरवंटे (24) आणि अंकिता अशोक अन्नदाते (21) अशा तीन जणांना ताब्यात घेतले.
हैदराबाद शहरातील नल्लागुट्टा पोलीस ठाण्यात या तिघांनी फसवणुकीचा प्रकार केला आहे. तेथे या तिघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 408,34 प्रमाणे गुन्हा क्रमांक 281/2022 दाखल आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पोलीस ठाणे भाग्यनगर येथे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करुन ए. कृष्णा आणि त्यांचे सहकारी पोलीस हैद्राबाद कडे रवाना झाले आहेत.