मुखेड(प्रतिनिधी)-मुखेड येथील तगलाईनगल्लीतील एक व्यक्ती आपल्या नातलगाच्या अंत्यविधीसाठी हैदराबादला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 4 लाख 70 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरला होता. मुखेड पोलीसांनी 24 तासाच्या आत या चोरट्याला जेरबंद करून चोरलेला 100 टक्के ऐवज जशास तसा जप्त केला आहे. नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कौतुक केले आहे.
मुखेडच्या तगलाईन गल्लीतील नजीर खान हनुमियॉं पठाण हे 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता तेलंगाणा राज्यातील हैद्राबाद येथे गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातलगाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात सामील होण्यासाठी गेले होते. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता परत आले असता त्यांचे घराच्या गेटला लावलेले कुलूप तोडलेेले होते. घरातून 11 तोळे सोने, 37 किलो चांदीचे दागिणे आणि 5 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 70 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला.
मुखेड पोलीसांनी केलेल्या मेहनतीला 24 तासातच यश आले आणि त्यांनी त्याच तगलाईन गल्लीत राहणारा आरबाज खान आयुब खान पठाण (20) यास ताब्यात घेतले. नजीर खान पठाणच्या घरातून चोरलेला सर्व सोन्या-चांदीच्या दागिण्यांचा ऐवज तशास-तसा आणि रोख रक्कम 5 हजार रुपये असा एकूण 4 लाख 70 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी मुखेडचे पोलीस निरिक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरिक्षक गजानन अनसापुरे, नरहरी फड, भारत जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक चंपती कदम, पोलीस अंमलदार दगडाजी धोंडगे, पांडूरंग पाळेकर, सिध्दार्थ वाघमारे, शिवाजी आडवे, बळीराम सुर्यवंशी, सचिन मुत्तेपवार, प्रदीप शिंदे, मारोती मेकलेवाड आणि गंगाधर जायभाये यांचे कौतुक केेले आहे.
या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक गजानन अनसापुरे यांनी पकडलेल्या अरबाज खान पठाणला न्यायालयात हजर केल्यानंतर मुखेड न्यायालयाने त्या चोरास तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी….
दिवाळीच्या रात्री एक जबरी चोरी, एक घरफोडी; 5 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास