नांदेड(प्रतिनिधी)-शेतीच्या वाटणीच्या कारणावरून रायखोड ता.भोकर या गावात भावांनी भावावर जिवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
लक्ष्मीकांत माधवराव आलेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास त्यांच्या शेतात ते बसले असतांना माझ्या शेतात कसा बसला अशी विचारणा त्यांचा भाऊ सुर्यकांत माधवराव आलेवाड याने केली. तु मला शेतीचा हिस्सा, घर वाटणीचा हिस्सा आणि जमा पैशांचा हिशोब बरोबर दिला नाहीस म्हणून वाद घातला. यात लक्ष्मीकांत आलेवाड यांनी सांगितले की, पंचासमक्ष 2 एकर शेतीसाठी मी तुला आगाऊ 15 लाख रुपये दिले आहेत. आता वाटणीचा हिशोब संपला. तेंव्हा सुर्यकांत माधवराव आलेवाड, त्यांचा मुलगा देवराव सुर्यकांत आलेवाड आणि त्यांची आई गोदाबाई सुर्यकांत आलेवाड या तिघांनी लक्ष्मीकांत आलेवाडला धरून विषारी औषध त्यांच्या तोंडात ओतले. आरडा-ओरड ऐकून लक्ष्मीकांत माधवराव आलेवाड यांचा मुलगा, आई आणि पत्नी धावत आले तेंव्हा जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे तिघे पळून गेले.
भोकर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 405/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 504, 506, 34 नुसार दाखल केला आहे. नांदेड ग्रामीणच्या पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील, भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राम कराड यांच्याकडे देण्यात आला आहे.
