नांदेड(प्रतिनिधी)-बसमधून प्रवास करतांना एका महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम तीन महिलांनी चोरून 6 लाख 97 हजार रुपयांच्या ऐवजाला गडप केले आहे. एका आडत दुकानातून कोणी तरी चोरट्यांनी 8 लाखांपैकी तीनच लाख रुपये चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
सौ.रोहिणी बाळासाहेब लाखे या महिला उमरखेडच्या राहणाऱ्या आहेत. दि.20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.45 ते 11.20 वाजेदरम्यान ही बस अर्धापूर ते नमस्कार चौक पर्यंत पोहचली या दरम्यान तीन अनोळखी महिलांनी रोहिणी लाखे यांच्या बॅगमधून सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 6 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते अधिक तपास करीत आहेत.
राजेंद्रनगर किनवट येथे अनिल किशनराव सूर्यवंशी यांचे आडत दुकानाचे कार्यालय आहे. दुकान उघडी ठेवून ते आणि त्यांचे सहकारी नोकर बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेल्या 8 लाख रुपयांपैकी 3 लाख रुपये चोरून नेले आहेत. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.
