तंत्रज्ञान ताज्या बातम्या

सीसीटीएनएस प्रणालीच्या कामकाजात नांदेड जिल्हा पोलीस दल सलग दुसऱ्या महिन्यात राज्यात प्रथम क्रमांकावर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सीसीटीएनएस प्रणालीने राज्यभरात सलग दुसऱ्या महिन्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 232 गुणांपैकी नांदेड जिल्ह्यातील सीसीटीएनएस प्रणालीला 227 गुण मिळाले आहेत. सीसीटीएनएस प्रणालीमध्ये काम करणाऱ्यांचे जिल्हा पोलीस दलातून कौतुक होत आहे.
सीसीटीएनएस प्रणालीमुळे राज्यात गुन्हेगारांना पकडणे, पोलीस ठाण्यातील कामकाज अद्यावत ठेवणे आदी बाबींना खुप मोठा वाव मिळाला. सीसीटीएनएस प्रणालीबाबत गुन्हे अन्वेषण विभाग पुणेचे अपर पोलीस महासंचालक दर महिन्याला तपासणी करत असतात. सप्टेंबर 2022 या महिन्यातील सीसीटीएनएस कामगिरीचे अवलोकन केल्यानंतर अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांनी नांदेड जिल्ह्यातील सीसीटीएनएस प्रणालीच्या कामकाजाला 232 गुणांपैकी 227 गुण दिले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात नांदेडच्या सीसीटीएनएस प्रणालीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 36 पोलीस ठाण्यांमधील प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोपपत्र , न्यायालयीन निकाल, हरवलेले व्यक्ती, अनोळखी मरण पावलेले व्यक्ती, अदखल पात्र खबर, गहाळ किंवा बेवारस मालमत्ता, प्रतिबंधात्मक कार्यवाही व इतर अशा एकूण 18 प्रकारच्या माहिती भरल्या जातात.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या नेतृत्वात, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात समन्वयक अधिकारी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, सीसीटीएनएस पथकातील पोलीस उपनिरिक्षक बशीर चौधरी, प्रणिता बाभळे, पोलीस अंमलदार समिर खान मुनीरखान पठाण, ओंकार सुरेश पुरी, माधव नारायण येईलवाड यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीएनएस प्रणाली पथकाचे कौतुक केले असून भविष्यात सुध्दा उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *