परतीच्या पावसाने माजवले तांडव
नांदेड(प्रतिनिधी)- पावसाने परत जाता-जाता विजांचा कडकडाट करून शेतकऱ्यांचा जिव घेण्याचा प्रकार चालविला आहे. निसर्गाच्या या आपत्तीत आज आता मौजे धावरी ता.लोहा येथे एक वडील आणि त्यांची लेक तसेच दुसरा एक कामगार असे तिन जण मरण पावले आहेत. यातील दुसऱ्या कामगाराची मुलगी गंभीर जखमी आहे. असाच एक प्रकार आज सिबदरा ता.हिमायतनगर येथे घडला. तेथे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
परतीच्या पावसाने आपला परतीचा प्रवास तांडव माजवत सुरू केला आहे. मागील 15 दिवसांमध्ये अनेक जागी विजा पडून शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. आज मौजे धावरी ता.लोहा येथे माधव पिराजी डुबूकवाड (40) रा.पानभोसी ता.कंधार, पोचीराम शामराव गायकवाड (50) रा.पेठपिंपळगाव ता.पालम जि.परभणी, त्यांची लेक रुपाली पोचीराम गायकवाड (16) हे शेतात ऊस तोड काम करत असतांना दुपारी 5 वाजेच्यासुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. ही सर्व मंडळी पावसापासून वाचण्यासाठी लिंबाच्या झाडाखाली थांबली. त्या लिंबाच्या झाडावरच विज पडली. त्यात या तिघांचा मृत्यू झाला. यांच्यासोबत मरण पावलेले कामगार माधव पिराजी डुबूकवाड यांची मुलगी पुजा माधव डुबूकवाड (16) ही याच विजेच्या प्रभावाने गंभीर जखमी झाली आहे. लोहाचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि त्यांच्या सहकारी अधिकारी व पोलीस अंमलदारांनी याबाबत त्वरीत कार्यवाही केली आहे. जखमीचा उपचार सुरू आहे.
असाच एक प्रकार सिबदरा ता.हिमायतनगर येथे घडला. तेथे सुनिल साहेबराव वायकोळे (34) हे शेतकरी आपले दुसरे साथीदार गजानन टोकलवाड यांच्यासह सोयाबीन काढत असतांना विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. सोयाबीनवर फारी झाकण्यासाठी गेलेल्या या दोघांवर वीज कोसळली त्यात सुनिल वायकोळे यांचा मृत्यू झाला आहे आणि गजानन टोकलवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. जमखीवर उपचार सुरू आहे. हिमायतनगर पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच त्यांना त्वरीत मदत केली.
