नांदेड,(प्रतिनिधी)- महादेव कोळी जामातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर भरती होऊन सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अंमलदाराविरुद्ध आता खोटे प्रमाणपत्र वापरून नोकरी संपादन केली अशा आशयाचा गुन्हा वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. नांदेड जिल्ह्यात महादेव कोळी ही जमात अस्तित्वातच नाही असा शासनाचा अभिलेख आहे. आज पर्यंत ज्यांनी खोटे महादेव कोळी जामातीचे प्रमाणपत्र घेऊन नोकरी संपादन केली त्या सर्वांचीच चौकशी व्हायला हवी.
नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस कल्याण विभाग पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अनिल खेलबा चोरमले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सेवानिवृत्त पोलीस हवालदार पुरभाजी जळबाजी मोरे बक्कल नंबर 1602 यांनी महादेव कोळी अनुसूचित जमातीचे खोटे जातीचे प्रमाणपत्र काढून ते खरे आहे असे भासवून ते प्रमाणपत्र नांदेड जिल्हा पोलीस भरतीसाठी वापरले. या आधारावर अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव असलेल्या पदावर पोलीस शिपाई या पदाच्या नियुक्तीचा लाभ मिळवला. महादेव कोळी जातीचे खोटे प्रमाणपत्र वापरून निवृत्त पोलीस हवालदार पुरभाजी जळबाजी मोरे राहणार वसरणी तालुका जिल्हा नांदेड यांनी शासनाची फसवणूक केली आहे.
पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलिसांनी सेवानिवृत्त पोलीस हवालदार पुरभाजी जळबाजी मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 363/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 465 , 468, 471,420 सोबत सह कलम म.आ.ज.वि.जाती भटक़्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र व पडताळणीचे विनीयमन) अधिनियम 2000 च्या कलम 11 नूसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण आगलावे करणार आहेत.
नांदेड जिल्ह्यात महादेव कोळी जमातीचे अस्तीत्व नाहीच असे शासनाच्या अभिलेखात नमूद असल्याचे जाणकारांचे मत आहे.पण नांदेड जिल्ह्यात अनेकांनी महादेव कोळी जमातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन ते वापरून शासनाची फसवणूक केली आहे.अशा सर्व खोट्या महादेव कोळी जमातीच्या नावावर नोकरी मिळवून फसवणूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल झालेच पाहीजेत.