नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या झाल्यानंतर सहा महिन्यांनी, काल दि. ७ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दिल्लीमधील जामनगर भागातून ३ जणांना ताब्यात घेतले. त्यातील दोन जण नांदेड येथे संजय बियाणी यांना गोळ्या मारणारे व्यक्ती आहेत. त्या दोघांमधील एक अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. या जगात मलाच सर्व काही कळते किंवा मी सर्वोउत्कृष्ट दाखविण्याच्या नादात नांदेडच्या महान पत्रकारांनी त्या विधीग्रस्तसंघर्षग्रस्त बालकाचे नाव लिहून, फोटो प्रसारीत करून बातम्या प्रसिद्ध केल्या. जलदगतीमध्ये त्यांचा क्रमांक लागला असेल, पण हे सर्व पत्रकार महाराज कायद्याच्या अडचणीत सापडले आहेत. याची जाणिवच त्यांना झाली नाही.
५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शारदानगर भागात राहणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे कुठून तरी बाहेरून आपल्या घरी पोहचले. गाडी उभी राहिली तेव्हा ते चारचाकी गाडीच्या मागच्या सिटवरून ड्रायव्हरच्या मागे असलेला दरवाजा उघडून फोनवर बोलत बाहेर आले आणि उजवीकडे वळण घेऊन पुन्हा घरात जाण्यासाठी दुसरीकडे वळले. याचवेळेस त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीसमोर आपली दुचाकी गाडी उभी केली, तोंड पूर्णपणे बांधलेल्या या दोन हल्लेखोरांनी धाव घेत संजय बियाणींना समोरून गाठले आणि त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. या गोळीबारात संजय बियाणी यांचा मृत्यू झाला. या हल्लेखोरांनी पळून जाताना आणि त्यांना आपल्या हातातील शस्त्रांचा धाक दाखवला.
या खुन प्रकरणासाठी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ११९/२०२२ दाखल करण्यात आला. त्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे ३०७, ३०२ यांच्यासह अनेक कलमे जोडली होती. सोबतच भारतीय हत्यार कायद्याची कलमे त्या गुन्ह्यात जोडलेली आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलाने या विशेष दुर्देवी घटनेसाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले. त्या गुन्ह्यात पुढे मकोका कायद्याची वाढ झाली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक आरचीत चांडक यांच्याकडे वर्ग झाला. दि. ७ ऑक्टोबर रोजी आरचीत चांडक यांनी या प्रकरणात ४१२३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्या गुन्ह्यातील १३ आरोपी तपास पथकाने शोधून काढले, ज्यांनी संजय बियाणींच्या हत्याकांडात गोळ्या झाडणार्यांना मदत केली होती. या प्रकरणाचा दोषारोपपत्रात एकूण १६ जणांची नावे आहेत. त्यातील ३ जण पकडणे, शिल्लक असल्यामुळे त्यांना फरार घोषीत करून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २९९ प्रमाणे हे दोषारोपपत्र दाखल झाले.
दरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने कालच दिल्ली येथे तीन जणांना ताब्यात घेतले. त्यातील दोन जण संजय बियाणी यांची हत्या करताना गोळ्या झाडणारे व्यक्ती आहेत आणि एक तिसरा अनेक अतिरेकी कारवायांसाठी दिल्ली पोलिसांना हवा होता. त्याबाबत दिल्ली पोलिसांच्या अधिकार्यांनी काल पत्रकार परिषदेत माहिती देताना पकडलेल्या एकाचे नाव दीपक उर्फ सुनील सुरेश सुखपुरीया असे असल्याचे सांगितले होते. तो आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक या दोघांनी संजय बियाणींचे हत्याकांड घडविताना गोळ्या झाडण्याचे काम केले होते, असे सांगितले. पोलिसांनी पकडलेला तिसरा आरोपी हा अश्वदीपसिंघ असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्या दिल्लीच्या पोलीस अधिकार्याने विधीसंघर्षग्रस्त बालकाचे नाव कायद्याच्या नियमामुळे मला सांगता येणार नाही, असेही पत्रकारांना सांगितले होते. पकडलेला तिसरा आरोपी अश्वदीपसिंघ हा अनेक घातपाती कारवायांसाठी पोलिसांना हवा असल्याचे सांगितले.
सुनील उर्फ दीपक सुखपुरीया आणि तो विधीसंघर्षग्रस्त बालक कॅनडा देशात राहणार्या एका अतिरेक्याच्या संपर्कात आहेत, रिंदाच्या सांगण्याावरूनच त्या दोघांनी संजय बियाणी यांची हत्या केली, त्या हत्येमागे ३ कोटी रूपये खंडणी मागणीचा प्रकार होता, असेही सांगितले. संजय बियाणींच्या हत्या करणार्या सुनील उर्फ दीपक सुखपुरीया आणि त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने संजय बियाणी यांची हत्या केल्यानंतर ४ ऑगस्ट २०२२ रोजी रानाकंदुवालिया या प्रतिस्पर्धी गँगमधील गुन्हेगाराचा खून, अमृतसर येथील रूग्णालयात केल्याचे सांगितले. या अगोदर ९ मे रोजी याच दोघांनी पंजाब पोलीस दलातील गुप्तचर विभागाच्या कार्यालयावर रॉकेटने हल्ला केला होता, अशीही माहिती दिली.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या लोकांची माहिती प्राप्त झाली. त्या अगोदर नांदेड जिल्हा पोलीस दलाने सुद्धा प्रेसनोट जारी करून संजय बियाणी हत्याकांडातील १३ पकडलेले आणि ३ फरार अशा १६ लोकांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना पाठविली. त्यानंतर दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण आले. आजच्या धावत्या जगात पत्रकारांना मी सर्वात प्रथम बातमी प्रसारीत केली यासाठीचा एक वेगळाच छंद आहे. त्या छंदातून पकडलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचे नाव आणि फोटो छापून पत्रकारांनी मी किती हुशार हे दाखवताना आपण कायद्याच्या चकाट्यात सुद्धा जात आहोत, याची जाण मात्र ठेवली नाही. असो पण हा प्रत्येकाचा आपला स्वतःचा विषय आहे. त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळे भोगावे लागतात.
आपण खूप भारीचे पत्रकार आहोत, हे दाखविण्याच्या नादात पोलिसांना दाखल केलेल्या संजय बियाणी हत्याकांडातील दोन आरोपींविरूद्ध मकोका कायदा रद्द झाल्याची माहितीच मात्र कोणाला मिळाली नाही. न्यायालयातील काही ज्येष्ठ विधीज्ञांनी सांगितल्यानुसार दोषारोपपत्र दाखल केलेल्या १६ आरोपींमधील गुरप्रितसिंघ उर्फ दान्या उर्फ सोनी गुलजारसिंघ खैरा आणि कमलकिशोर गणेशलाल यादव या दोन्ही आरोपी क्रमांक १२ आणि १३ यांना मकोका कायद्यातून मुक्त करण्यात आले आहे, पण त्यांच्याविरूद्ध संजय बियाणी हत्याकांडात त्यांचा सहभाग असल्याची बाब या दोषारोपपत्रात आहे. त्यासंदर्भाने पोलीस विभागाकडे विचारणा केली असता कोणीही त्यास दुजारा देत नाही. सोमवारी या प्रकरणाचे दोषारोपपत्र आरोपींच्या वकिलांना प्राप्त होईलच, त्यावेळी वास्तव न्यूज लाईव्हने लिहिलेल्या शब्दांमधील सत्यता वाचकांसमोर नक्कीच येईल. एकंदरीत संजय बियाणी यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करणारे आरोपी पोलीस विभागाने जेरबंद करून पोलीस विभागावर असणार्या संशयाला फुलस्टॉप लावला आहे. पोलीस दल नांदेडचे असेल, दिल्लीचे असेल, पण अखेर ते पोलीसच आहेत, हे मात्र नक्की.