ताज्या बातम्या नांदेड

पीएफआय संघटनेच्या तीन सदस्यांचा मुक्काम तुरूंगात 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवला

नांदेड (प्रतिनिधी)- पॉपुलर फं्रट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी आणल्यानंतर इतवारा पोलिसांनी पीएफआयच्या तीन सदस्यांवर केलेली स्थानबद्धता न्यायालयाने पुन्हा एकदा वाढवून दिली. आता या तिघांना 10 ऑक्टोबरपर्यंत तुरूंगात रहावे लागेल.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एनआयए आणि एटीएस यांनी देशभर पीएफआय संघटनेवर कार्यवाही करत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले. महाराष्ट्रात या संदर्भात चार गुन्हे दाखल झाले. या संदर्भाने नांदेड जिल्ह्यात सुद्धा एका गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक झाली.

इतवारा पोलीस ठाण्याने पीएफआयवर शासनाने बंदी आणल्यानंतर शहरातील पीएफआय संघटनेचे सदस्य आमेर खान अमजद खान (35) संगणक चालक, रा. हैदरबाग नांदेड, अब्दुल नदीम अब्दुल वाहेद (33) संगणक काम रा. हमीदिया कॉलनी, अताउर रहेमान शेख अहेमद (34) रबर स्टॅम्प मेकर रा. मदीनानगर नांदेड या तिघांविरूद्ध इतवारा पोलीस ठाण्यात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 151 प्रमाणे प्रतिबंधात्मक कार्यवाही क्र. 1-2-3/2022 दाखल करून त्या तिघांना 28 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करून समाजातील परिस्थिती लक्षात घेता न्यायालयाने यांचे स्वातंत्र्य बाधित करून त्यांना स्थानबद्ध करावे अशी विनंती केली होती. त्या दिवशी न्यायालयाने ती विनंती मान्य करून त्या तिघांना 4 ऑक्टोबरपर्यंत तुरूंगात पाठवून दिले होते.

4 ऑक्टोबर रोजी स्थानबद्धेची मुदत संपल्यानंतर इतवाराचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी या तिघांना न्यायालयात हजर करून यांच्या स्थानबद्धेची मुदत वाढवून देण्याची विनंती केली. याप्रसंगी सरकारी वकील ऍड. विजय तोटेवाड यांनी सादरीकरण करताना पुढे असलेला दसरा सण आणि इतर सामाजिक परिस्थिती लक्षात घेता यांची स्थानबद्धता वाढविण्यात यावी असे सांगितले. स्थानबद्ध तीन व्यक्तींच्यावतीने ऍड. सय्यद अरीबोद्दीन यांनी सांगितले केली की, स्थानबद्धतेसाठी आवश्यक पुरावे न्यायालयासमक्ष नाहीत, त्यामुळे स्थानबद्धता वाढविण्यात येऊ नये. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. जाधव यांनी तिघांची स्थानबद्धता 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *