नांदेड(प्रतिनिधी)-सिंधी येथे दरोडा टाकणाऱ्या आरोपीने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकावर गोळीबार केला होता. त्याचे उत्तर स्थानिक गुन्हा शाखेने जशास तसे देऊन गोळीबार करत एकाला पकडले. एक पळून गेला आहे. दरोड्यातील रोख रक्कमेपैकी 1 लाख 95 हजार 440 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
2 ऑक्टोबरच्या पहाटेच्या 3.45 वाजता स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग व्यंकट माने आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदा हे गस्त करत असतांना नांदेड-पुणेगाव रस्त्यावरील वांगी पाटी येथे एका दुचाकीला थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी बालाजी संभाजी महाशेट्टे (21) रा.धनज ता.मुदखेड हा दुचाकीवर मागे बसला होता. त्याने आपल्याकडील पिस्तुलने पोलीसांवर गोळीबार केला. तेंव्हा पोलीस पथकाने त्यास तशास-तसे उत्तर दिले आणि त्यातील एक गोळी बालाजी संभाजी महाशेट्टे याला लागली आणि तो दुचाकीवरुन खाली पडला. दुचाकी चालवणारा अमोल जाधव रा.मुदखेड हा दुचाकी घेवून आल्यादिशेने परत पळनू गेला. पोलीस पथकाने बालाजी संभाजी महाशेट्टेला ताब्यात घेतले.
पांडूरंग व्यंकट माने यांच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 353, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3/25 आणि 27(2) यानुसार गुन्हा क्रमांक 593/2022 दाखल केला आहे. घटना घडल्यानंतर सकाळी 11 वाजता पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून सर्व पाहणी केली.
बालाजी संभाजी महाशेट्टेला पकडल्यानंतर त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल 20 हजार रुपये किंमतीचे, एक काडतूस 300 रुपये किंमतीचे, एक मोबाईल 15 हजार रुपयांचा आणि रोख रक्कम 1 लाख 95 हजार 440 रुपये असा एकूण 2 लाख 30 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. पकडलेला बालाजी संभाजी महाशेट्टे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणात सिंधी गावकऱ्यांनी सुध्दा एक आरोपी पकडला होता. त्याच्यावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
