नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगर भागात 30 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास एका 40 वर्षीय व्यक्तीचा खून झाला. घरातील सांडपाणी आमच्या घरासमोर का फेकता या कारणावरुन घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी शिवाजीनगर पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहेत.
दि.30 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास यशपाल सोपानराव भिसे (40) हा आपल्या घरासमोर उभा असतांना अमोल आनंदराव गोवंदे, त्याचा मेहुणा किरण मारोती खंडेजोड, वडिल आनंदराव किशनराव गोवंदे, त्याची पत्नी शिल्पा अमोल गोवंदे आणि आई वंदना आनंदराव गोवंदे आणि अमोलची बहिण चांदनी किरण खंडेजोड या सर्वांनी मिळून घराच्या गॅलरीमध्ये त्याची छातीवर धार-धार शस्त्रांनी वार करून त्याच्या गळ्यावर चाकु चालवून जखमी केले. जखमी यशपाल भिसेला दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत राहुल सोपानराव भिसे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 363/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 143, 148, 149 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला.
शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.व्ही. वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे यांनी त्वरीत प्रभावाने सर्व मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख आदींनी शिवाजीनगर पोलीसांचे त्वरीत कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.
