उमरी(प्रतिनिधी)-सिंदी ता.उमरी येथील व्यंकटराव कवळे पाटील बिगर शेती पत संस्थेवर आज दुपारी 2 वाजता 6 दरोडेखोरांनी शस्त्रदरोडा टाकून 2 लाख 2 हजार 590 रुपये लुटले आहेत. दरोडेखोर पळून जात असतांना गावकऱ्यांनी एका दरोडेखोराला पकडून चांगलाच चोप दिला. इतर दरोडेखोरांना आम्ही लकवरच जेरबंद करून असा विश्र्वास उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी व्यक्त केला आहे.
सिंदी ता.उमरी मारोतराव कवळे गुरूजी यांची पतसंस्था आहे. दुपारी 2 वाजेच्यासुमारास तोंड बांधून सहा दरोडेखोरांनी या पतसंस्थेचे प्रवेश केला आणि प्रत्येकाने आपल्याजवळील तलवार उगारुन तेथील उपस्थितांना एकीकडे गोळा केले. काही दरोडेखोरांनी तेथे उपस्थित पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांना मारहाण केली. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना एकीकडे उभे करून दरोडेखोरांनी आत घुसून कॅश कॉऊंटरमधील रक्कम गोळा करून तेथून पोबारा केला. दरोड्याची सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. दरोडेखोर पळून जाण्याची खबर गावकऱ्यांना पोहचली आणि गावकऱ्यांनी दरोडेखोरांना पुर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केला. पण पाच दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. पण एक गावकऱ्यांच्या हाती लागला. त्याच्याकडे पैसे सापडले नाहीत. पण गावकऱ्यांनी त्या दरोडेखोराला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले आपल्या सहकारी पोलीस अंमलदारांसह तेथे पोहचले. गावकऱ्यांनी पकडलेल्या दरोडेखोराचे नाव मनजितसिंघ किशनसिंघ चिरपल्लीवाले (30) असे आहे. बॅंकेतून एकूण 2 लाख 2 हजार 590 रुपये दरोडेखोरांनी लुटले आहेत. उर्वरीत दरोडेखोरांना आम्ही लवकरात लवकर जेरबंद करू असा विश्र्वास उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी व्यक्त केला आहे.
संबंधीत बातमीचा व्हिडीओ….
