नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील 05 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदारा नोंदणी कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत होणार आहे. पात्र शिक्षकांनी या निवडणूकीत आपली नव्याने नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
आज बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुक उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयेळे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती होती. शिक्षक मतदार संघासाठी डी नोव्हा पध्दत वापरली जाते. ज्यात जुन्या मतदार यादीचा कोणताही संदर्भ घेतला जात नाही. दर निवडणुकीच्यावेळी संपुर्ण यादी नव्याने तयार होते. या शिक्षक मतदार संघात माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, तांत्रिक शिक्षक हे सर्व मतदार असतात. ज्या शिक्षकांनी मागील सहा वर्षांमध्ये सलग किंवा खंडीत अशी तीन वर्ष शिक्षक सेवा केली असेल ते या निवडणुकीत मतदार म्हणून पात्र असतात. यासाठी सेवा कालावधीचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र ते सुध्दा निवडणुक ओळखपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी नमुना क्रमांक 19 हा फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात कोठेही शिक्षक ही नोकरी असेल तर तो व्यक्ती या मतदार संघातील सर्वसामान्य रहिवासी असावा. प्रत्येकाने आपला अर्ज स्वत:किंवा मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांच्या हस्ते पाठवायचा आहे. राजकीय व्यक्ती जे गठ्ठा मतदान आणतात ते अर्ज अमान्य होणार आहेत. शासन मान्य सर्व शैक्षणिक संस्थांनी आपल्या येथील शिक्षकांची या मतदार संघात नोंदणी करून घेण्यासाठी प्राधान्य क्रम देणे आवश्यक आहे.
सुरू असलेल्या शिक्षक मतदार संघाची मुदत फेबु्रवारी 2023 मध्ये संपत आहे. त्यासाठी नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या निवडणुकीत विभागीय आयुक्त हे मतदारा नोंदणी अधिकारी आहेत. सर्व जिल्हाधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. निवडणुकीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात अर्ज स्विकारले जाती. मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी म्हणून 15 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर या दोन दिवशी मतदार नोंदणीची प्रसिध्दी पुन्हा केली जाणार आहे. या निवडणुकीतील दावे आणि हरकती स्विकारण्यासाठी 7 नोव्हेंबर 2022 हा दिवस निश्चित आहे. प्रारुप मतदार याद्यांची छपाई 19 नोव्हेंबर रोजी पुर्ण होईल. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 23 नोव्हेंबर 2022 रोजी होईल. या प्रसिध्द मतदार याद्यांवर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर असा आहे. आलेले दावे आणि हरकती 25 डिसेंबरपर्यंत निकाली काढले जातील आणि शिक्षक मतदार संघाची अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिध्द होणार आहे.
जास्तीत जास्त लोकांनी मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करावे
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार मतदार ओळख पत्र हो आधारकार्डशी लिंक करण्याची मोहिम सुरू आहे. या मोहिमेत नांदेड जिल्ह्यात एकूण 55.50 टक्के मतदारांनी आपल्या आधार कार्डासोबत मतदान कार्ड लिंक केले आहे. यामध्ये शहरी विभागात लिंक करण्याची प्रक्रिया अत्यंत कमी आहे. तेंव्हा सर्व मतदारांनी आपले मतदान कार्ड आधार कार्डसोबत लिंक करावे असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
30 सप्टेंबर 2022 पर्यंत आधार कार्ड सोबत मतदार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया विधानसभा मतदार संघनिहाय पुढील प्रमाणे आहे. किनवट-44.05 टक्के, हदगाव-65.01, भोकर-60.88, नांदेड दक्षीण-28.00, नांदेड उत्तर-34.20, लोहा-68.74, नायगाव-62.66, देगलूर-63.20, मुखेड-75.74 अशी आहेत.
