ताज्या बातम्या नांदेड

वीस वर्षांपासून करार तत्त्वावर काम करणाऱ्या क्षयरोग कर्मचाऱ्यांचे नांदेडमध्ये आंदोलन सुरु

नांदेड,(प्रतिनिधी)- गेल्या वीस वर्षांपासून करार तत्त्वावर काम करणाऱ्या क्षयरोग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

 

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणारे करार तत्त्वावरील कर्मचारी मागील २० वर्षांपासून सेवारत आहेत . अद्यापही शासनाच्या उदासीनतेमुळे राज्यातील २२०० कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम होऊ शकले नाहीत .वारंवार शासन स्तरावर मागणी , विनंती करूनही शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. सदर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे तुटपुंजे मानधन , इंधन , प्रवास व दैनिक भत्ते अदा करतानाही अनियमितपणा आहे . या बाबीचा निषेध नोंदविण्यासाठी व शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले जावे म्हणून महाराष्ट्र राज्य क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून दि. २९ व ३० सप्टेंबर २०२२ रोजी विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील क्षयरोग विभागातील करार तत्वावरील कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे .जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर हे आंदोलन सुरू आहे.

दिनांक २९ व ३० सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व ३ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी अधिवेशन तसेच ६ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा क्षयरोग केंद्र नांदेड समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हास्तरावर अशा प्रकारचे धरणे आंदोलन संबंधित जिल्ह्यातील कर्मचारी करणार आहेत . यापुढील आंदोलन ही तीव्र स्वरूपाचे असणार असल्याचे महाराष्ट्र राज्य क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव अनिरुद्ध भावसार , नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सोनवणे, सचिव सय्यद अयुब , शहराध्यक्ष दिलीप लांडगे सचिव ज्ञानेश्वर पगारे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे .

क्षयरोग विभागातील करार तत्वावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आरोग्य विभागातील विविध संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला असून कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्याय विरोधातील मागण्या रास्त स्वरूपाचे आहेत , असे या संघटनांचे म्हणणे आहे .

 

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *