नांदेड (प्रतिनिधी)-कोविड कालखंडात एनआरआय यात्री निवास आणि पंजाब भवन यात्री निवासचा वापर महानगरपालिकेने कोविड रुग्णांना ठेवण्यासाठी केला होता. जवळपास 7 कोटी रुपये महानगरपालिकेकडे प्रलंबित आहेत. हे पैसे लवकरात लवकर द्यावेत असे मागणी करणारे निवदेन काही युवकांनी आज मनपा आयुक्तांना दिले आहे. हे निवेदन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी स्विकारले.
कोविड -19 या कालखंडात गुरूद्वारा बोर्डाच्या मालकीचे एनआरआय निवासमधील 145 कक्ष आणि पंजाब यात्री निवास येथील 150 कक्ष महानगरपालिकेने विलगिकरण करण्यासाठी वापरले होते. गुरूद्वारा बोर्डाने याबाबत महानगरपालिकेला 22 जुलै 2020 ते 8 जुलै 2021 या दरम्यान कक्षांचे भाडे मिळावे म्हणून आठ अर्ज केले आहेत. गुरुद्वारा बोर्डाच्या मागणीनुसार 4 कोटी 76 लाख 13 हजार 680 रुपये असे भाडे आहे. तसेच विलगिकरण बंद झाल्यानंतर त्यात खराब झालेले साहित्य बदलणे आणि रंगरंगोटी करणे यासाठी 2 कोटी 2 लाख 31 हजार 44 रुपये खर्च झाला आहे. यादरम्यान महानगरपालिकेने 24 महिन्यांमध्ये वापरलेली विद्युत आणि त्याचे बिल दिले आहेत. परंतु आजही जवळपास 7 कोटी रुपये महानगरपालिका गुरूद्वारा बोर्डाला देणे शिल्लक आहे.
या संदर्भाने काही युवक प्रितपालसिंघ शाहु, हरजितसिंघ पदम, केरसिंघ खालसा, नवज्योतसिंघ पहरेदार, मनप्रितसिंघ कारागिरी, मनबिरसिंघ ग्रंथी आणि अवतारसिंघ पहरेदार यांनी 27 सप्टेंबर रोजी मनपा आयुक्तांना ही रक्कम, अर्थात 7 कोटी रुपये लवकरात लवकर गुरूद्वारा बोर्डाला द्यावी असे एक निवेदन दिले आहे. हे निवेदन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी स्विकारले आहे. या निवेदनात थकीत 7 कोटी रक्कम लवकर दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा लिहिलेला आहे.
