नांदेड(प्रतिनिधी)-घरगुती गॅस सिलेंडरला बदलून ते इंधन बेकायदेशीरित्या चार चाकी वाहनांमध्ये भरण्याचा नवीन कारखाना गणेशनगर वाय पॉईंटजवळ सुरू आहे. या कारखान्याला कोणाचे संरक्षण असेल? पण या कारखान्यामुळे कांही लोकांना रोजगार भेटला हे सुध्दा तेव्हढेच खरे आहे.
चार चाकी वाहनांमध्ये गॅस भरण्याची पध्दत सुरु झाल्यानंतर त्यासाठी लागणारे गॅस पंप अजूनही कमी प्रमाणात आहेत. गाड्यांच्या संख्येत मात्र वाढ होत गेली आहे. 45 रुपये किलो दराप्रमाणे मिळणारा गॅस आता शासकीय दराप्रमाणे 90 रुपयांच्या आसपास झाला आहे. तरी पण त्याची उपलब्धता सहज नाही. महानगरे, राष्ट्रीय महामार्ग या भागात सीएनजी गॅस सहज उपलब्ध होतो. परंतू छोट्या-छोट्या गावांमध्ये या सीएनजी गॅस पंपची कमतरता आहे. जेवढे कायदे तयार होतात त्यातून वाचण्याचे मार्ग सुध्दा तेवढचे असतात असे एका मोठ्या नेत्याने नांदेड येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानुसार अवैधरित्या सुरू झालेल्या सीएनजी गॅस पंपाची सुध्दा कमरता नाही. त्यातील एक बेकायदेशीर सीएनजी गॅस पंप शहरातील गणेशनगर भागातील वाय पॉईंटजवळ सुरू आहे.
नांदेड शहरात आणि जिल्ह्यात सुध्दा सीएनजी गॅस पंपाची मागणी प्रमाणे उपलब्धता नाही. याचाच फायदा बेकायदेशीर पणे घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस चार चाकी वाहनांमध्ये भरण्याचा एक नवीन उद्योग सुरु झाला. चार चाकी वाहनांना लागणारा गॅसचा भाग घरगुती गॅस सिलेंडरमध्ये उपलब्ध नसतो. तरीपण आपली गरज म्हणून चार चाकी वाहनधारक अशा पध्दतीने बेकायदेशीररित्या घरगुती गॅस सिलेेंडरला सीएनजी या इंधनात बदलून ते इंधन आपल्या वाहनात वापरण्यासाठी बाध्य होतात आणि हाच संधीचे सोने करण्याचा प्रकार आहे. संधीचे सोने करणाऱ्यांमध्ये बेकायदेशीररित्या घरगुती गॅस गाड्यांच्या वापरासाठी भरणाऱ्यांचा आकडा खुप मोठा आहे. कमी काळात लवकर श्रीमंत होण्याचा हा मार्ग अनेकांनी अवलंबला आणि नांदेड शहराच्या गणेशनगर भागातील वाय पॉईंटजवळ असा एक नवीन धंदा सुरू झाला आहे. या अवैध, बेकायदेशीर गॅस पंपाला कोणाचे संरक्षण असेल? याचा शोध घेण्यासाठी एखादी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची गरज आहे.
याच गणेशनगर भागात शिवाजीनगर पोलीस ठाण्याची चौकी सुध्दा आहे. तरी सुध्दा हा व्यवसाय जोरातच चालतो. याच भागात दररोज गुलाम पाडला जातो. अर्थात 52 पत्याचा झन्ना-मन्ना आणि तिर्रट नावाचा जुगार सुध्दा अत्यंत बेमालूमपणे बलशाली मारोती रायाच्या शेजारी सुरू आहे. तरी पण या भागाकडे कोणीच लक्ष देत नाही. चालणाऱ्या अवैध धंद्यामुळे काही युवकांना, काही बालकांना रोजगार पण मिळाला आहे ही या व्यवसायामधली चांगली बाजू आहे असे म्हणावे लागेल.
