नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुपूरी ग्राम पंचायतमध्ये काही ग्राम पंचायत सदस्यांच्या नावे त्यांनी केलेले अतिक्रमण संकेतस्थळावर नमुद करून गावातील मालकीचा नमुना क्रमांक 8 त्यांना देण्यात आला आहे. परंतू इतर मंडळींना मात्र राजकीय हेतुतून ती सुविधा मिळत नाही म्हणून आजपासून जवळपास 200 लोकांनी ग्राम पंचायत कार्यालय विष्णुपूरी समोर उपोषणास सुरूवात केली आहे.
अर्जदार अर्थात उपोषणकर्ते भगवान बालाजी हंबर्डे यांच्यासह एकूण 41 लोकांच्या स्वाक्षऱ्या असलेले एक निवेदन प्राप्त झाले. या निवेदनानुसार अर्जदार सांगतात विष्णुपूरी शेत गट क्रमांक 72 आणि 75 या दोन्हीमध्ये वस्तीवाढ झाली आहे. 1984 पासून कांही लोकांनी आणि 1992 पासून कांही लोकांनी या शेत गटात अतिक्रमण केलेले आहे. ग्रामण पंचायत विष्णुपूरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या माहितीनुसार या गटांमध्ये एकही भुखंड रिकामा राहिलेला नाही.
गट क्रमांक 72 व 75 वरील मोकळ्या जागेवर झालेली अतिक्रमणे ग्राम पंचायत कार्यालयाने नमुना क्रमांक 8 वर मालकी हक्कात नोंदी केल्या आहेत. तसचे त्या अतिक्रमण केलेल्या भुखंडांना बांधकाम परवाने देखील दिलेले आहेत. ते भुखंड भोगवटदार म्हणून ग्रामविकास अधिकारी, ग्राम पंचायत विष्णुपूरी तसेच विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदेड यांनी प्रमाणित करून त्या अतिक्रमीत मालमत्ता करपात्र आहेत अशी नोंद ऑनलाईनवर केली आहे. ही नोंद असतांना सुध्दा ग्राम पंचायत कर घेत नाही असे करणे म्हणजे हा ग्राम सेवकांच्या कर्तव्यातील कसुर आहे.
ग्राम पंचायत विष्णूपूरी येथे निवडूण आलेले प्रतिनिधी केशव व्यंकटराव सातपुते, सविता बालाजी सातपुते, संजय पांडूरंग कांबळे, विद्यासागर संजय कांबळे, शंकर नामदेव हंबर्डे आणि अर्चिना विश्र्वनाथ हंबर्डे आणि इतर लोकप्रतिनिधींची नावे भोगवटदार म्हणून मालमत्ता वहित नोंद करण्यात आली आहेत आणि त्याची नोंद नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यात आली आहे.
राजकीय सुड उगवत उपोषणकर्त्याच्या नावाची नोंद भोगवटदार म्हणून ऑनलाईन मध्ये असतांना सुध्दा त्यांची नोंद नमुना क्रमांक 8 मध्ये उपलब्ध असतांना सुध्दा त्यांना त्या बाबतच्या नकला दिल्या जात नाहीत. शासनाचा दि.16 फेबु्रवारी 2018च्या शासन निर्णयानुसार अशा अतिक्रमीत जागांची नोंद भोगवटदार म्हणून घेणे बंधनकारक असतांना सुध्दा अशी नोंद घेण्यात आलेली नाही. हा सर्व प्रकार केवळ राजकीय सुडापोटी केला जात असल्याचे उपोषणकर्ते लोक सांगतात.
दि.19 सप्टेंबर रोजी उपोषणाबाबतचा अर्ज गावकऱ्यांनी विष्णुपूरीच्या सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक यांना दिल्या सोबतच या अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, गटविकास अधिकारी नांदेड, नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे नांदेड, खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.मोहनराव हंबर्डे आणि आ.बालाजी कल्याणकर यांना पण दिल्या. या प्रकरणात नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक यांनी स्वाक्षरी केलेली एक नोटीस प्राप्त झाली ज्यावर नाव नाही फक्त पद लिहिलेले आहे. तसेच या नोटीसवर 149 फौजदारी प्रक्रिया संहितेचा उल्लेख करण्यात आला आहे. या नोटीसवर भगवान बालाजी हंबर्डे रा.विष्णूपूरी व इतर 41 लोक यांना त्या नोटीसची प्रत पाठविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये आमरण उपोषणाच्या दरम्यान काही कायदा व सुव्यवस्था असा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी आपल्या निश्चित करून त्यावर कायदेशीर कार्यवाही होईल असे लिहिले आहे. याला संदर्भ जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचा लिहिलेला आहे पण तो जमाव बंदी आदेश कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत अंमलात आहे हे लिहिलेलेे नाही. अत्यंत तात्काळगतीने नांदेड ग्रामीण पोलीस निरिक्षकांनी केलेली ही कार्यवाही प्रशंसनिय आहे.