नांदेड(प्रतिनिधी)-एनआयएने राज्यभर पापुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या लोकांवर कार्यवाही सुरू केल्यानंतर नांदेडमध्ये सुध्दा पाच जणांना अटक झाली होती. त्यात साहवा फरार झाला होता. त्यास एटीएस पथकाने काल पकडले होते. आज दि.27 सप्टेंबर रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी पीएफआयच्या साहव्या सदस्याला पहिल्या पाचसह 30 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.21 सप्टेंबर रोजी नांदेड एटीएसने पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये मोहम्मद मेहराजोद्दीन अब्दुल हई अन्सारी (42) रा.हैदरबाग नांदेड आणि अब्दुल सलाम अब्दुल कयुम (34), मोहम्मद निसार मोहम्मद अब्दुल रशीद (41), मोहम्मद जावेद मोहम्मद शब्बीर अन्सारी (45) आणि मोहम्मद अब्दुल करीम अब्दुल हलीम (37) चौघे रा.परभणी अशा पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते. 22 सप्टेंबर रोजी या पाच जणांना 30 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले.
एटीएस पथकाचे पोलीस उपअधिक्षक पानेकर आणि पोलीस निरिक्षक सुनिल नाईक यांनी त्या दिवशी या प्रकरणातील एक मोहम्मद आबेद अली मोहम्मद महेबुब अली हा फरार असल्याचे न्यायालयाला सांगितले होते.
26 सप्टेंबर रोजी एटीएस पथकाने पाठविलेल्या माहितीनुसार 22 सप्टेंबर रोजी पीएफआय विरुध्द चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रात 20 जणांना अटक करण्यात आली आहे. या चार गुन्ह्यांपैकी एक गुन्हा 22/2022 मध्ये उपरोक्त पाच जण पोलीस कोठडीत आहेत. त्यातील फरार असलेला मोहम्मद आबेद अली मोहम्मद महेबुब अली (40) यास 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
आज अटक करण्यात आलेल्या मोहम्मद आबेद अलीला एटीएस पथकाने न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपींच्यावतीने ऍड. सय्यद अरिबोद्दीन यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एकून न्यायाधीश जैन देसरडा यांनी मोहम्मद आबेद अलीला पहिल्या पाच जणांनासह 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोहम्मद आबेद अली यांचे देगलूर नाका परिसरात एक ऍटोमोबाईल्सचे दुकान आहे. त्यांचे शिक्षण 12 वी पर्यंत पुर्ण असून पदवी प्राप्त केली की नाही याबद्दल माहिती मिळाली नाही. तीन बंधूमध्ये मोहम्मद आबेद अली हे दुसऱ्या क्रमांकाचे बंधू आहे.
