नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात असलेल्या जगावेगळ्या अजब उड्डाणपुलावर खाजगी लोकांनी आपल्या गाड्यांसाठी त्या पुलाला वाहनतळ बनवले आहे. वजिराबाद भागातील डॉक्टर्सलेनमध्ये एक मार्गी वाहतूक असतांना विरुध्द बाजून घुसणाऱ्या लोकांमुळे त्या ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा तर उडतोच पण अति गरजेच्या वेळेत रुग्णवाहिकेतून प्रवास करत दवाखाना गाठणाऱ्या रुग्णांना मरणाची भिती जास्त वाढली आहे.
नांदेड शहरात पुर्वेकडून पश्चिमेकडे जातांना एक अजब पुल तयार करण्यात आला. जगात नसेल असा हा पुल आहे. या पुलावर येण्यासाठी आणि या पुलावरून बाहेर जाण्यासाठी पाच ठिकाणी मार्ग आहेत असा हा जगातील एक विशेष पुल आहे. या पुलावर दक्षीणेकडे सुध्दा एक मोठा रस्ता आहे जो रस्ता डॉक्टर्सलेन भागात जातो. या रस्त्यावर वेगवेगळ्या लोकांनी हा पुलाचा रस्ता आपल्या वाहनतळासाठी वापरण्याची सुरूवात करून त्यावर आपला सातबारा असल्यासारखे हे लोक वागतात. या पुलावर एकाबाजूने पुलाच्या 75 टक्के भागात खाजगी लोकांनी आपल्या गाड्या लावून त्याला वाहनतळ बनवले आहे. उर्वरीत जागेतून एकदाच दोन-चार चाकी गाड्या आल्या आणि त्यांना एक दुसऱ्याच्या विरुध्द दिशेला जायचे असेल तर मोठीच अडचण आहे. एकीकडे वाहनतळ असतांना परस्पर विरोधी बाजूला जाणाऱ्या दोन चार चाकी गाड्यांना या रस्त्यावर संधीच नाही. त्यामुळे एका गाडीला वाहनतळाच्या अलीकडेच किंवा पलीकडेच थांबावे लागते. तेंव्हा एक गाडी पास झाल्यावर दुसरी जावू शकते. त्यामुळे डॉक्टर्सलेनमध्ये जाण्यासाठी अत्यंत निकडीची गरज असतांना या ठिकाणी मात्र त्याचाही बोजवारा उडतो.
शहरातील आयुर्वेदीक दवाखान्यासमोरुन सुध्दा एक मोठी डॉक्टर्सलेन आहे. त्या डॉक्टर्सलेनमध्ये रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता सुध्दा आहे. हा रस्ता पोलीसांनी एक मार्गी वाहतूक केलेला आहे. पण या एकमार्गी वाहतूक रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे यारस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्यावर असलेले दवाखाने आणि मेडीकल दुकान या दोन्ही बाजूला आणि त्या दुकानांसमोर लावलेली वाहने आणि एक मार्गी रस्ता असतांना दोन्हीकडून सुरू असणारी वाहतुक या ठिकाणी पुन्हा कोंडी करते. एखादी रुग्णवाहिका आपले सायरन वाजवत येत असेल तरी कोणीही त्याकडे लक्ष देत नाही.कोणीही आपला रस्ता सोडत नाही, रुग्णवाहिकेला जागा करून दिली जात नाही. अशा परिस्थितीत लवकरात लवकर दवाखान्यात जाण्यासाठी रुग्णवाहिकेमधील प्रवास सुध्दा रुग्णांना मृत्यूची भितीच दाखवत आहे. कोण देणार याकडे लक्ष?
शहरात दवाखान्याचे वाहनत कोठे आहेत
नांदेडमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता नांदेडमध्ये दवाखान्यांची संख्या सुध्दा तेवढ्याच जोरात वाढली. या परिस्थितीत प्रत्येक दवाखान्याला स्वत:चे वाहनतळ असणे आवश्यक आहे. कोठे आहे पण वाहनतळ याची तपासणी होण्याची गरज आहे. तर महानगरपालिकेकडून बांधकाम परवानगी घेतांना नकाशात दाखवलेले वाहनतळ शोधणे आवश्यक आहे. नकाशात वाहनतळ दाखवले होते तर ते प्रत्यक्षात असायला हवे या विषयावर पुन्हा एकदा पुढकार घेईल, कोण त्याचा शोध घेईल याबद्दल पण माहिती मिळवणे खुप अवघड आहे.
