नांदेड(प्रतिनिधी)-मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका पत्रकाराची 32 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन दरोडेखोरांनी खंजीरचा धाक दाखवून तोडून नेल्याचा प्रकार आज सकाळी 7 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
कौठा भागात राहणारे पत्रकार तुकाराम सावंत हे दररोजप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले. नियमित कार्यक्रमानुसार त्यांच्यासोबत नेहमी 8 ते 10 लोक असतात परंतू आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने त्यातील बरीच मंडळी ध्वजारोहण सोहळ्यासाठी गेली होती. म्हणून तुकाराम सावंत एकटेच मॉर्निंग वॉकला गेले. ते हस्सापूरजवळ पोहचल्यानंतर त्या ठिकाणी दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यात असलेली 32 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तोडून नेली आहे. तुकाराम सावंत यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.
