नांदेड(प्रतिनिधी)-जीवनात सरडा आपले रंग बदलण्यासाठी प्रख्यात आहे. पण तो आपल्याकडे येणाऱ्या धोक्यासाठी आपला रंग बदलतो कारण त्याला आपले प्राण वाचवायचे असते. पण जगात माणसे संधी पाहुन रंग बदलतात. असाच प्रकारचा एक रंग नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी सुरू आहे. कोण असेल तो दावेदार ? किंबहुना आता असलेले सिंहासन सोडण्याची त्या सिंहाची तयारी आहे काय? ही परिस्थिती मांडण्यासाठी शब्दाच्या माध्यमातून शब्दांचे मोल जपत केलेला हा छोटासा प्रयत्न.
कालच पोलीस बदल्यांचा मुहूर्त लागला. 77 राज्य सेवा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव तयार होण्याच्या मार्गावर आहे. या अगोदर यापेक्षा वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असे भाकित सुध्दा प्रसिध्द झाले होते. बदल्या तर होणारच. त्यात नवल ते काय? नांदेड जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख आता थोड्याच दिवसात बदलून जाणार अशाही वावढ्या आल्या होत्या.त्यांनी सुध्दा नांदेड येथे आपला दोन वर्षाचा कार्यकाळ याच महिन्यात पुर्ण करणार आहेत. त्यामुळे त्यांची बदली होईलच. तसेच नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक सुध्दा काही दिवसांमध्ये दोन वर्ष पुर्ण करणार आहेत त्यांचीही बदली होईलच. हा प्रकार शासकीय नोकरीत असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवनात येतच असतो. त्यात नवीन काही नाही. प्रश्न त्या बाबीचा आहे की हे जाणार म्हणून आपले सिंहासन कोठे बसवायचे याची तयारी करणाऱ्यांचा आहे. पायाच्या टाचा उंच केल्याने माणसाची उंची वाढत नाही. ती तर जेवढे तुम्ही आपले डोके झुकवाल त्याप्रमाणात तुमची उंची वाढत असते. याची जाणीव नसणाऱ्या अनेकांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर विराजमान होण्याची फिल्डींग लावायला सुरू केली आहे.
आपल्याला कर्तत्व आणि नेतृत्व उसने मिळत नसते. त्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. याबाबीला न विचार करता सिंहासन आम्हाला मिळावे यासाठी चाललेली ही स्पर्धा अत्यंत दुर्देवी आहे. जीवनात पहिले जन्माच पान आणि शेवटी मृत्यूचे पान हे दोनच लिहिलेले आहे. बाकीची सर्व पाने आपल्या शब्दांमध्ये, आपल्या कर्तत्वाने भरली जातात. सिंहासारखे वागले तर जिथे बसलात तेथेच सिंहासन तयार होईल. त्यासाठी सिंहासन शोधण्याची आणि त्याच्यासाठी तडफड करण्याची गरज नसते. तरीपण स्थानिक गुन्हा शाखा नांदेडचे सिंहासन मिळविण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहुन हसु येते.
या सिंहासनाच्या तडजोडीमध्ये प्रयत्नरत असलेल्या महाभागांचे वर्णन आम्ही आता केले तर पुन्हा वास्तव न्युज लाईव्हवर अलंकारीक भाषा वापरून बदनामी केली, ब्लॅकमेलिंग केली, त्रास दिला असे आरोप होतील. ज्या नतदृष्टांना अलंकारच कळत नाही त्यांना अलंकारीक भाषा कशी कळली आणि त्या माध्यमातून त्यांनी वास्तव न्युज लाईव्ह बद्दल निवेदन तयार केले हे पाहुन किव येते. त्या निवेदनातील शब्द आणि त्याचे अपभ्रंश ऐवढे घाणेरडे आहे की, ते लिहुन आम्ही आपल्या शब्दांचे मोल कमी करू इच्छीत नाही. त्यात काही तथाकथीत पत्रकार सुध्दा सहभागी झाले. त्यांच्या बद्दल तर स. आदत हसन मंटो या पत्रकारंानी जवळपास 70 वर्षांपुर्वी लिहिले शब्द अत्यंत बोलके आहेत. ते पुन्हा एकदा उल्लेखीत करून घाणेरड्या लोकांचा उल्लेख करण्याची इच्छा आज तरी नाही.
त्यामुळे आम्ही साध्या शब्दात असे लिहु इच्छीतो की, आज या खुर्चीवर बसलेल्या सिंहाची पोलीस सेवा जवळपास 12 महिन्यांची शिल्लक आहे. ज्यावेळेस या बद्दल करण्याची वेळ येईल. त्यावेळेस त्यांच्याकडे कायद्याने दिलेला अधिकार आहे. शेवटच्या तीन वर्षात त्यांना हवी ती जागा देणे बंधनकारक आहे आणि या बंधनाला कोणी झुगारलेच तर प्रशासकीय न्यायाधीकरणाची दारे काय बंद झाली आहेत? कोणी राजकीय व्यक्तींकडून आपण त्या सिंहासनावर जावे यासाठी प्रयत्नरत आहेत. त्या राजकीय लोकांना सुध्दा आता लक्षात आलेले आहे की, काही दिवसांपर्यंत ते महाभाग जे स्थानिक गुन्हा शाखेच्या सिंहासनावर येवू इच्छीतात ते महाभाग कोणाचे उंबरठे झिजवत होते. याची नोंद त्या राजकीय लोकांनी पण घेतलेली आहे. पुढे येणारे पोलीस अधिक्षक आणि परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक किंवा पोलीस उपमहानिरिक्षक यांची सुध्दा मर्जी असावी लागेल. आजच्या सिंहासनावर बसलेल्या सिंहाने केलेल्या त्यांच्या काळातील कामगिरीचा आढावा नवीन येणारे अधिकारी पण घेतील. त्यांच्या कामगिरीच्या तुलनेत सिंहासनाची आशा करणाऱ्या लांडग्यांची अवस्था अत्यंत कमजोर आहे हे नवीन अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल याची जाण सुध्दा ठेवायला हवी. एक तर जिल्हा बदलून नांदेडला येणार आणि आपले सेवा सहा ते सात महिने शिल्लक राहिली असतांना स्थानिक गुन्हा शाखेच्या सिंहासनावर बसण्याच्या शर्यतीत उतरला आहे. हे पाहिल्यावर हसू येते. असो कोणाच्या नशिबात आहे हे नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे सिंहासन हे आमच्या वाचकांना सुध्दा कांही दिवसांत कळेलच.
