नांदेड(प्रतिनिधी)- संपूर्ण कारकिर्द शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारुन करोडोची माया जमवणाऱ्या वादग्रस्त तत्कालीन अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी बदली झाल्यानंतरही दोन महिन्याचा आसपास कालवधी लोटला तरी शासकीय बंगला व शासकीय वाहनावर अवैध ताबा अद्यापही ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबतची खामोशी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
नांदेड सार्वजनिक बांधकाम मंडळाचे तत्कालीन अधिक्षक अभियंता अविनाश त्र्यंबकराव धोंडगे यांची जवळपास साडे तीन वर्षानंतर दि.25 जुलै 2022 रोजी बदली झाली. लगेच त्यांनी बदली रद्द करण्यासाठी मॅटमध्ये धाव घेतली. त्यांच्या जागी आलेल्या अधिक्षक अभियंता राजपूत यांचे कुठलेही आदेश लागू नसल्याचे दि.29 जुलै 2022 रोजी पत्र काढून त्यांच्या रुजू झालेल्या प्रशासकीय पध्दतीलाच आव्हान दिले होते. अद्यापही धोंडगे यांना महाराष्ट्रात कुठेही पदभार देण्यात आला नाही. पण पुन्हा सहा महिने तरी नांदेडला येता येईल का यासाठी केवीलवाना प्रयत्न करत असल्याचे बोलल्या जात आहे.
नियमानुसार बदली झाल्यानंतर दुसऱ्या अधिकारी त्यांच्या जागी आल्यावर तात्काळ शासकीय बंगाला व शासकीय वाहन सोडणे कृमप्राप्त असते पण जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी अवैध पध्दतीने ताबा ठेवून बसल्याने त्यांच्यावर नियमभंगाची कारवाई का होत नाही असा प्रश्र्न विचारल्या जात आहे. वरिष्ठ अधिकारी बघ्याची भुमिका का घेत आहेत याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे. नवीन रुजू झालेले अधिक्षक अभियंता यांना राहण्याची उचीत सोय नसल्याचे दिसून येत आहे. मुख्य अभियंता यांनीही या एवढ्या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याने त्यांच्या आर्थिक हितसंबंधाच्या, मैत्रीची जाणीव ठेवत असल्याचे बोलल्या जात आहे.
एकंदरीतच शासकीय निधीवर डल्ला मारण्याची धोंडगे यांची सवय शासकीय बंगला व वाहनाच्या अवैध ताबा ठवेण्यासाठी कामाला येत असल्याचे दिसून येत असून लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.
