ताज्या बातम्या नांदेड

मर्चंट्‌स बॅंकेचे व्यवस्थापक प्रेमराज शर्माने मला देशोधडीला लावले-अरुणकुमार अग्रवाल

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील एका व्यावसायीकाला द नांदेड मर्चंट्‌स को-ऑप बॅंक लि.यांनी 1 कोटी 14 लाख रुपयांचे कर्ज आणि त्यावरील व्याज यासाठी त्याची सर्व संपत्ती कुलूप तोडून ताब्यात घेतल्याप्रकरणी या व्यावसायीकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अर्ज केला आहे. या व्यावसायीकाने सांगितले की, बॅंकेचे व्यवस्थापक प्रेमराज शर्मा यांच्यामुळेच मला देशोधडीला लागण्याची वेळ आली. मी बॅंकेचा सदस्य असतांना प्रेमराज शर्मा हे 3 टक्के व्याजाने माझ्याकडून पैसे घ्या आणि बॅंकेत भरा असे मला सांगतात. अशा प्रकारे ते स्वत:चा सावकारी धंदा चालवतात. तसेच आपल्या सावकारी धंद्याच्या वसुलीसाठी बॅंकेच्या पिग्मी वसुली एजंटचा उपयोग करतात असे वास्तव न्युज लाईव्हला सांगितले.
दि.8 सप्टेंेबर रोजी नांदेड येथील व्यावसायीक अरुणकुमार ओंकारमल अग्रवाल यांनी वास्तव न्युज लाईव्हला आपली बातमी छापण्यासाठी लेखी पत्र दिले आणि त्यासोबत त्यांनी दिलेल्या विविध अर्जांच्या प्रति दिल्या. सोबतच बरीच तोंडी माहिती सुध्दा सांगितली. अरुण अग्रवाल यांच्या सांगण्याप्रमाणे मी मर्चंट्‌स को-ऑप.बॅंकेचा सदस्य आहे. वेगवेगळ्या कर्ज खात्यामध्ये मला या बॅंकेचे व्यवस्थापक प्रेमराज विष्णुदास शर्मा यांनी एकूण 1 कोटी 14 लाखांचे कर्ज दिले. एका कर्जाची परतफेड करून दुसरे कर्ज देण्यासाठी माझ्या संपत्तीला तारण ठेवतांना त्या संपतीची किंमत वेगवेगळ्या वेळेस त्यांच्याच निर्धारका (व्हॅल्यूऐटर) कडून किंमत वाढवून घेतली आणि मला कर्ज दिले. एकच बॅंक आणि वेगवेळ्या खात्यात मला सहा वेगवेगळ्याप्रकारचे कर्ज दिले त्याची एकूण किंमत 1 कोटी 14 लाख रुपये होती.
दरम्यान कोविड कालखंड आला आणि त्यामुळे दुकान बंद राहिले आणि मी बॅंकेच्या हप्त्यांची परतफेड करू शकलो नाही. त्यावेळी माझ्यावर प्रेमराज शार्म यांनी दबाव आणला की, माझ्याकडून 3 टक्के व्याजाने रक्कम घ्या आणि बॅंकेत जमा करा. पण ती रक्कम मला पुरणार नव्हती म्हणून मी तसे काही केले नाही. प्रेमराज शर्मा हे स्वत: सावकारी व्यवसाय करता आणि या सावकारी व्यवसायाची वसुली बॅंकेच्या पिग्मी एजंटांमार्फत करून घेतात.
दि.26 ऑगस्ट 2022 रोजी माझे दुकान बंद असतांना अपर निबंधक यांच्या आदेशानुसार लायक गोरेमिया नेरलीकर यांना 6 मे 2022 रोजी मिळालेल्या अधिकारानुसार जप्ती करण्यात आली. जप्ती करण्याच्या आदेशात सहकार कायदा कलम 91, 98 आणि 101 यांची पुर्णपणे मालमल्ली करण्यात आली. आजच्या परिस्थितीत मी माझे कुटूंब घेवून इतरांच्या घरी आश्रय घेतलेला आहे. माझे घर, माझे दुकान आणि गोडाऊन सिल करण्यात आले आहे. या संदर्भाने मी बॅंकेच्या काही संचालकांकडे तक्रार केली असता ते याबद्दल काही दखल घेत नाहीत कारण प्रेमराज शर्मा हे या बॅंकेचे व्यवस्थापक आहे आणि संचालकांसाठी काही मिनिटात करोडो रुपयांचे कर्ज ते मंजुर करतात म्हणून प्रेमराज शर्मा विरुध्द कोणीच माझ्या तक्रारीची दखल घेत नाही.
या संदर्भानेच मी 5 सप्टेंबर 2022 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याडे तक्रार केली असून माझ्याविरुध्द करण्यात आलेल्या जप्तीच्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी आणि बेकायदेशीर कृत्याची चौकशी करावी असे या अर्जात लिहिल्याची माहिती अरुणकुमार अग्रवाल यांनी दिली. यासंदर्भाने अरुणकुमार अग्रवाल यांनी पोलीस ठाणे इतवारा आणि पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथै सुध्दा अर्ज दिले आहेत. त्यांच्याही प्रति वास्तव न्युज लाईव्हला दिल्या आहेत.
मी एक उत्कृष्ट व्यवसायीक असल्यामुळेच मला सहा वेगवेगळ्या खात्यामध्ये बॅंकेने आपल्या फायदा पाहत कर्ज दिले. मी नियमित कर्जाची परतफेड करत होतो. परंतू लॉकडाऊनमुळे माझ्या व्यवसायाची वाताहत झाली आणि तिथुनच मला बॅंकेचे रक्कम परत फेड करण्यात अडचणी आल्या. सिडको येथे माझे एक घर आहे. त्याची बाजारातील किंमत जवळपास सव्वा कोटी आहे. पण प्रेमराज शर्मा यांनी मला स्वत:च्या स्वार्थासाठी ते माझे घर कोणाला तरी विकुया आणि बॅंकेचे कर्ज फेडू असा सल्ला दिला. मी त्यासाठीही तयार झालो असे अरुणकुमार अग्रवाल यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले. त्यानंतर मला 90 लाखांपासून माझ्या घराची किंमत सांगितली. त्यात मीच त्या घरात राहायचे आणि त्याचे भाडे 30 हजार रुपये द्यायचे असा प्रस्ताव प्रेमराज शर्मा यंानी दिला. पुढे माझ्या घराची किंमत 65 लाख रुपये पर्यंत पाडण्यात आली आणि मीच त्या घरात राहायचे आणि त्याचे भाडे 50 हजार रुपये द्यायचे असा प्रस्ताव देण्यात आला. पण तो मी मंजुर केला नाही आणि म्हणूनच माझ्याविरुध्द प्रेमराज शर्मा यांनी जप्तीची कार्यवाही करून मला देशोधडीला लावले आहे यासाठीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अर्ज केला असल्याचे अरुणकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *