नांदेड(प्रतिनिधी)- गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पोलीस हप्ते घेतात, बिट जमादार हप्ते घेतात असे शब्द वापरून पोलीसांविषयी अप्रितीची भावना चेतवल्याप्रकरणी गंगाखेड पोलीसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
29 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सु.श्री.संत जनाबाई कॉलेज गंगाखेड येथील मिटिंग हॉलमध्ये श्री गणेशोत्सव संदर्भाने शांतता समितीची बैठक होती. श्री गणेशोत्सव उत्कृष्ट व शांततेत साजरा व्हावा या संदर्भाने चर्चा होणे आवश्यक होते. परंतू आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्या विषयाला सोडून पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हप्ते घेतात, बिट जमादार हप्ते घेतात, तुम्ही आमच्यासमोर हप्ते घेता असे भाषणाच्या दरम्यान बोलले. मुळात पोलीसांचा हप्ता हा विषय त्यादिवशी नव्हताच तरी पण आमदारांनी पोलीसांची प्रतिमा मल्लीन करून अबु्र नुकसान केली आहे. याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गंगाखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल किशन माने यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर आ.रत्नाकर गुट्टे यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 500 आणि पोलीस(अप्रितीची भावना चेतविणे) अधिनियम 1922 च्या कलम 3 नुसार गुन्हा क्रमांक 412/2022 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक संदीप गडदे हे करणार आहेत.
कोठे श्री गणेशोत्सवाची चर्चा, कोणते आमदारांचे भाषण, कोणते आमदारांचे शब्द सर्वच काही ओके आहे अशा स्वरुपातला घडलेला हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. पोलीसांच्या विषयीची भावना जी काही असे ती योग्य पुराव्यांसह वर्तवता आली पाहिजे. नाही तर फक्त शब्दांचे डोंगर उभे करून टाळ्या मिळविण्यात काही अर्थ नसतो हे या गुन्ह्यानंतर समोर आले.
