नांदेड(प्रतिनिधी)-सिरंजनी ता.हिमायतनगर येथे मारोती मंदिराचे गेट तोडून चोरट्यांनी दानपेटी फोडली आणि छोट्या-छोट्या मुर्त्या चोरून नेल्या आहेत. कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शिक्षकेच्या घरात घुसून गुन्हेगाराने तिला मारहाण करून चाकुने भोकसले आहे.
सिरंजनी ता.हिमायतनगर येथील दत्ता देवराव धमनवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेनंतर एक ते तीन अनोळखी चोरट्यांनी मारोती मंदिराच्या गेटमध्ये प्रवेश करून दानपेटी फोडली. त्यातून 12 हजार रुपये रोख रक्कम चोरली. मंदिरातील कांही देवांच्या छोट्या-छोट्या मुर्त्या 12 हजार 500 रुपये किंमतीच्या चोरून नेल्या आहेत. असा एकूण 24 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. हिमायतनगर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 192/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 380 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक बी.डी.भुसनुर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
एका 50 वर्षीय शिक्षकेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर खडकीबेस गल्ली कुंडलवाडी येथे आहे. दि.27 ऑगस्टच्या रात्री 8.15 वाजता एक अनोळखी माणुस आपल्या तोंडावर रुमाल आणि डॉक्याला सर्दीच्यावेळेस घालतात अशी टॉपी, हातात केसरी रंगाचे रबरी हातमोजे, निळे टिपके असलेले डिझाईनचे शर्ट व निळ्यारंगाचा फुल पॅन्ट, धुळीने माखलेली काळी चप्प घालून घरात घुसला. त्याने भाजी चिरण्याचा चाकु दाखवून शिक्षकेला सोना और पैसे निकाल असे सांगितले. त्यांनी प्रतिकार केला असता शिक्षकेला ढकलून देवून त्या दरोडेखोराने चाकुने त्यांच्या डाव्या बाजूस भोकसले आणि बुक्यांनी हातावर व डोक्यात मारले. या तक्रारीनुसार कुंडलवाडी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 88/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 394 (क) नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक करीम खान पठाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी हे करीत आहेत.
