नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस लाईन धुळे येथे घडलेल्या गुन्ह्याची नोंद लोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी धुळे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
धुळे येथील पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या एका 24 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या इमारतीत एक व्यक्ती आला आणि त्याने दारुच्या नशेत त्यांच्या घराचे दार उघडले. महिलेला पाहुन ते व्यक्ती म्हणाला मला रेखा (काल्पनीक नाव) यांच्या घरात जायचे आहे आणि माफी मागून निघून गेला. या बाबतची माहिती त्या घराच्या महिलेने रेखाला विचारली तेंव्हा रेखाचे दोन भाऊ (अनोळखी) आणि रेखा या तिघांनी मिळून तुझ्या बापाची इमारत आहे काय असे बोलून त्यांना मारहाण केली आणि रेखाच्या दोन्ही भावांनी त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आणि त्यांचा विनयभंग केला.
लोहा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देतांना तक्रारदार महिलेने उशीराचे कारण लिहितांना मला जास्त त्रास असल्याने अहमदपुर ते धुळे प्रवास करून धुळे येथे जाणे शक्य नसल्याने मी लोहा येथे येवून तक्रारारीचा जबाब दिला आहे. यावरुन लोहा पोलीसांनी रेखा (काल्पनीक नाव) आणि तिचे दोन भाऊ (अनोळखी) यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354(ब), 324, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 165/2022 दाखल केला आहे. घडलेला प्रकार हा धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतला असल्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी धुळे पोलीस शहर येथील पोलीस निरिक्षकांकडे वर्ग करण्यात आला आहे.
